नवी दिल्ली : होळी किंवा धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळण्याच्या निमित्ताने टवाळखोर तरुणींची छेड काढत असल्याचा प्रकार अनेक वेळा समोर आला आहे. पाणी, रंग, अंडी यांनी भरलेले फुगे मारल्याचं ऐकिवात होतं, मात्र दिल्लीत रोडरोमियोंनी अत्यंत हीन पातळी गाठली आहे. आपल्यावर वीर्य भरलेले फुगे अंगावर मारल्याचा दावा दिल्लीतील कॉलेज विद्यार्थिनीने केला आहे. दिल्लीतील एलएसआर अर्थात लेडी श्रीराम कॉलेज फॉर वुमेनमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. रविवारी दिल्लीतील अमर कॉलनी मार्केटमध्ये आपल्यावर वीर्य भरलेले फुगे फेकल्याचं संबंधित तरुणीने सोशल मीडियावर लिहिलं आहे. फुग्यांमुळे आपली कुर्ती आणि लेगिंग्जवर पांढरे डाग पडल्याचं तिने सांगितलं. परिसरात असे प्रकार वाढल्याचं आपल्या मैत्रिणीने सांगितलं. त्यामुळे मी कॉलेजमधल्या इतर विद्यार्थिनींशीही या विषयी बोलले, असं तरुणीने म्हटलं आहे. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासायला सुरुवात केली आहे.