पाटणा : बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी एनडीएतून बाहेर पडले आहेत. बिहारमधील विरोधी पक्षातील नेत्या राबडी देवी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर जीतन राम मांझी यांनी हा निर्णय जाहीर केला.


बिहारमधील महायुतीत गुरुवारी सहभागी होणार असल्याचं जीतन राम मांझी यांनी सांगितलं. मंगळवारी आरजेडी नेते भोला यादव यांनी जीतन राम मांझी यांना आरजेडीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं.

बिहारमध्ये दोन विधानसभा आणि लोकसभेच्या एका जागेवर 11 मार्च रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र जागावाटपावरुन जीतन राम मांझी गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. जीतन राम मांझी यांनी जहानाबादच्या जागेसाठी तिकीट मागितलं होतं. मात्र हे तिकीट त्यांच्या पक्षाला मिळालं नाही.

दरम्यान एनडीएने 2015 च्या विधानसभा निवडणुकीत जीतन राम मांझी यांच्या पक्षाला 20 जागा दिल्या होत्या. मात्र त्यांना केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. जीतन राम मांझी यांनी स्वतः दोन जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांना एकाच जागेवर विजय मिळाला.

जीतन राम मांझी यांनी बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूतून वेगळं होत हिंदुस्तानी आवाम मोर्चा या पक्षाची स्थापना केली होती. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून जीतन राम मांझी यांचा कार्यकाळ केवळ दहा महिन्यांचा होता.