नवी दिल्ली : हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या करणाऱ्या रोहित वेमुलाच्या भावाला दिल्ली सरकारने क्लर्कच्या नोकरीची ऑफर दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे रोहितचा भाऊ राजा वेमुला याच्याकडे एमएससीची पदवी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या या ऑफरवर जोरदार टीका होत आहे. हैदराबाद विद्यापीठाच्या काही विद्यार्थांनी ही ऑफ अपमानजनक असल्याचं म्हटलं आहे.
सहानुभूती म्हणून या नोकरीची ऑफर देण्यात आल्याचं राजा वेमुलाने सांगितलं. मात्र एमएमसी फर्स्ट क्लास असलेल्या राजाने ही ऑफर अजून स्वीकारलेली नाही.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येवर वाद झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 24 फेब्रुवारी रोजी त्याच्या आईची भेट घेतली होती. तसंच रोहितच्या भावाला नोकरी देण्याची घोषणाही केली होती.
असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्र, मात्र ऑफर क्लर्क पदाची
शैक्षणिक पात्रतेचा विचार केल्यास राजा वेमुलाने पाँडिचेरी सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून फर्स्ट क्लाससह एमएससीची पदवी मिळवली आहे. इतकंच नाही तर तो नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) साठीही पात्र ठरला आहे. या पदवीमुळे त्याला देशातील कोणत्याही कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसरची नोकरी मिळू शकते.
दिल्ली सरकारचा युक्तिवाद
तर दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, "सहानुभूतीच्या आधारावर केवळ ग्रुप सी आणि ग्रुप डी (क्लरिकल लेवल) ची नोकरी दिली जाऊ शकते. रोहितच्या कुटुंबीयांनी दिल्लीत स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि राजा वेमुलाला नोकरी देण्याची विनंती केली होती. इतकंच नाही तर आम्ही त्यांना राहण्यासाठी घराचाही प्रस्ताव दिला होता. आर्थिक संकटात असलेल्या वेमुला कुटुंबाची मदत करण्याचा आमचा हेतू होता"