Punjab Election 2022 : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने प्रचाराला सुरूवात केली आहे. लोकांच्या घरोघरी जाऊन आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते प्रचार करत असल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसांच्या पंजाब दौऱ्यावर आहेत. आज चंदीगढ येथे केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार देखील केला. तसेच या निवडणुकीत आम आदमी पार्टीला सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेला 10 आश्वासने दिली आहेत.


पंजाबच्या जनतेला आता बदल करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा जनतेने फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी केजरीवाल यांनी केले आहे. 1966 पासून आजपर्यंत 25 वर्ष काँग्रेसने तर 19 वर्ष बादल परिवाराने पंजाबवर राज्य केले आहे. या दोघांनी मिळून भागिदारीमध्ये पंजाबवर राज्य केल्याचा आरोपही यावेळी केजरीवाल यांनी लगावला. दोघांपैकी कोणाचेही सरकार असले तरी ऐकमेकांवर यांनी कधीच कारवाई केली नाही, दोघांनी मिळून पंजाबला लुटले असल्याचा आरोप यावेळी केजरीवाल यांनी केला आहे.



केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेला १० आश्वासने दिली आहेत. ती नेमकी कोणती ते पाहुयात.


1) पंजाबला भ्रष्टाचारमुक्त करणार
2) नशामुक्त पंजाब करुन, शांतता आणि बंधुभाव आणणार
3) पंजाबमध्ये १६ हजार मोहल्ला क्लिनीक करणार, पंजाबवासियांना मोफत उपचार
4) दिल्लीप्रमाणेच पंजाबमध्ये मोफत आणि २४ तास वीज देणार
5) १८ वर्षावरील प्रत्येक महिलेला १००० रुपये देणार
6) शेतीसंबंधी ज्या समस्या आहेत त्या दूर करणार
7) व्यपारी आणि उद्योगपती यांच्यावर जे रेड राज आहे ते बंद करणार 
8) शिक्षक चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवतील, त्यांना आंदोलनाची वेळ येणार नाही 
9) सर्व धर्मियांच्या ग्रथांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
10) असा पंजाब बनवू की कॅनडाला गेलेली मुलंसुद्धा परत येतील


तिकीट विक्रीच्या आरोपाबाबत अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पार्टी हा 1947 नंतरचा सर्वात प्रामाणिक पक्ष आहे. कारण एकही तिकीट आम्ही विकले नाही. तिकीट विकल्याचे कोणी सिद्ध केले तर विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्याला पक्षातून काढून टाकेन. एवढेच नाही तर त्याचा पाठलाग मी नरकापर्यंत सोडणार नाही असे देखील केजरीवाल यावेळी म्हणाले. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत घरोघरी प्रचारात पंजाबचे प्रदेशाध्यक्ष भगवंत मानही होते. घरोघरी प्रचारासाठी केजरीवाल चंदीगडमधील खानपूर गावातील खरार विधानसभेत पोहोचले. यावेळी ते उमेदवार अनमोल गगन मान यांच्यासाठी मते मागताना दिसले. 


महत्त्वाच्या बातम्या: