Arvind Kejriwal : पुढील वर्षी दिल्लीच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वीच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) एकामागून एक घोषणा करत आहेत. आता त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. संजीवनी योजनेंतर्गत दिल्लीतील 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व वृद्धांवर दिल्लीतील कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. 


दिल्लीतील सर्व ज्येष्ठांसाठी एक आनंदाची बातमी असल्याचे केजरीवाल म्हणाले. दिल्लीत 60 वर्षांवरील सर्व नागरिकांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. ही हमी अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की, वडिलांनीच कुटुंबाला चांगले शिक्षण दिले आणि आज त्यांचे कार्य करण्यास सक्षम केले. परंतु अनेक वेळा रुग्णालयांमध्ये उपचाराअभावी वृद्धांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते. बऱ्याचवेळी अनेकजण वृद्धांवर उपचार घेण्यास टाळाटाळ करतात कारण त्यावर भरपूर पैसा खर्च होतो. पण आता वृद्धांना मोफत उपचार देणार असल्याचे केजरीवाल म्हणाले.


दिल्लीतील सर्व वृद्धांसाठी संजीवनी योजना


रामायणातील एका घटनेचे उदाहरण देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, लक्ष्मणजी जेव्हा बुशुद्ध झाले होते तेव्हा हनुमानजी त्यांच्यासाठी संजीवनी घेऊन आले होते. आज आम आदमी पार्टीने दिल्लीतील सर्व वृद्धांसाठी संजीवनी योजना आणली आहे. या योजनेंतर्गत 60 वर्षांवरील वृद्धांवर दिल्लीतील सर्व सरकारी आणि गैर-सरकारी रुग्णालयात मोफत उपचार केले जातील. या योजनेअंतर्गत कोणत्याही वृद्धांना मोफत उपचार मिळणार आहेत. यात ना श्रीमंत दिसतो ना गरीब, ना कुठली मर्यादा. अरविंद केजरीवाल यांनी एका जाहीर सभेत ही घोषणा केली आहे. ज्यामध्ये दिल्लीतील विविध भागातील मोठ्या संख्येने ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल एकामागून एक योजनांची घोषणा करत आहेत. याआधीही त्यांनी ऑटोचालकांसाठी आणि मुलीच्या लग्नासाठी विम्याची योजना आणली होती.


दिल्लीत राजकीय वातावरण तापायला सुरुवात


पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहे. यापूर्वीच तिथं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहे. आम आदमी पार्टीसह काँग्रेस आणि भाजपने देखील तयारी सुरु केली आहे. सध्या दिल्लीत आम आदमी पार्टीची सत्ता आहे. हे सरकार घालवण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आण आदमी पार्टीने देखील निवडणुकीच्या दृष्टीनं जोरदार तयारी सुरु केली आहे. विविध योजनांची घोषणा केली जात आहे.