नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात याठिकाणी प्रमुख लढत होणार आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत एकूण 1.47 कोटी मतदार असून 672 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे 70, भाजपचे 67 आणि काँग्रेसचे 66 उमेदवार तर 148 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 2688 ठिकाणी 13750 मतदान केंद्रांची निवडणूक आयोगाने निर्मिती केली आहे. या निवडणुकीत 20 हजार 385 ईव्हीएम मशिन्सचा वापर होणार आहे. सर्वाधिक 28 उमेदवार नवी दिल्ली विधानसभा क्षेत्रात आहेत, तर सर्वात कमी 4 उमेदवार पटेल नगर विधानसभा क्षेत्रात आहेत. नवी दिल्ली विधानसभा क्षेत्रातून अरविंद केजरीवाल स्वत: निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दिल्लीतील 3141 पोलिंग बूध संवेदनशील आहेत. यातील शाहीनभाग भागातील पाच मतदान केंद्र संवेदनशील आहेत.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत म्हटलं की, मतदान करायला बाहेर जरुर पडा. सर्व महिलांना आवाहन आहे की,ज्याप्रमाणे तुम्ही घराची जबाबदारी उचलता तशीच देश आणि दिल्लीची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घ्या. सर्व महिलांनी मतदान नक्की करा आणि घरातील पुरुषांनाही घेऊन जा. यावेळी कुणाला मतदान करायचं याची चर्चा जरुर करा.





पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत म्हटलं की, "दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस आहे. सर्व मतदारांना आवाहन आहे की, अधिक संख्येने मतदान करा आणि नवीन विक्रम प्रस्थापित करा."





निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा बॉर्डरवर सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. शाहीनबागमध्ये सीएएविरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळे जामिया परिसरातही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जामिया भागात पोलीस वाहनांची देखील तपासणी करत आहेत.





Operation Lotus | राज्यात ऑपरेशन 'कमळ' की कमळाचं 'ऑपरेशन'? | स्पेशल रिपोर्ट | ABP MAJHA