नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच स्थानिक तसेच राष्ट्रीय पक्ष प्रचाराच्या कामाला लागले आहेत. प्रचारासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने एक घोषणा तयार केली आहे. "अच्छे बीते पांच साल, लगे रहो केजरीवाल", अशी आपची घोषणा आहे. आम आदमी पार्टीला टक्कर देण्यासाठी भाजपनेही या घोषणेसारखीच घोषणा तयार केली आहे. पांच साल दिल्ली बेहाल, अब नहीं चाहिए केजरीवाल, अशी घोषणा भाजपने दिली आहे.


2015 मध्ये आम आदमी पार्टीने 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कार्यकाळ फेब्रुवारीमध्ये संपतोय. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल, तसेच फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक पार पडेल.


निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC कंपनीशी हातमिळवणी केली आहे. प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या प्रचाराची कमान सांभाळली होती. त्यानंतर 2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार आणि 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत अमरिंदर सिंह यांच्या प्रचाराची जबाबदारी किशोर यांनी सांभाळली होती.


2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणडणुकीच्या वेळी प्रशांत किशोर यांनी अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेसला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर 2019 मध्ये प्रशांत किशोर यांनी आंध्र प्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळली.