धूम्रपानाला विरोध करणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 21 Sep 2017 11:42 AM (IST)
सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करत असल्याने गुरप्रीत आणि त्याच्या मित्राने आरोपीला हटकलं. संतापलेल्या आरोपीने दोघांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यात बाचाबाची झाली.
नवी दिल्ली : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या तरुणाला रोखणाऱ्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीमध्ये 21 वर्षीय तरुणाची गाडीखाली चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. गुरप्रीत सिंग आणि त्याचा 22 वर्षीय मित्र मणिंदर सिंग हे फोटोग्राफीचे विद्यार्थी रात्रीच्या वेळी डॉक्युमेंट्रीच्या शूटिंगसाठी निघाले होते. रात्री एकच्या सुमारास सफदरजंग हॉस्पिटलजवळ असलेल्या हॉटेलपाशी ते थांबले होते. त्यावेळी आरोपी रोहित कृष्ण महंत त्यांच्याजवळ उभा राहून धूम्रपान करायला लागला. सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करत असल्याने दोघांनी त्याला हटकलं. संतापलेल्या आरोपीने गुरप्रीत आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ केली आणि तिघांमध्ये बाचाबाची झाली. इतरांनी हस्तक्षेप केल्यामुळे दोघं जण त्यांच्या बाईकवरुन निघून गेले. रोहितच्या मनात मात्र राग धुमसत होता. त्याने आपल्या गाडीने दोघांच्या बाईकचा पाठलाग केला. दोघांनी जेमतेम 400 मीटर अंतर पार केलं असेल, त्याचवेळी रोहितच्या कारने बाईक जोरदार धडक दिली. कारखाली चिरडल्याने गंभीर जखमी झालेल्या गुरप्रीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर मणिंदरवर उपचार सुरु आहेत. बाईकसोबतच रोहितने आणखी एक रिक्षा आणि टॅक्सीलाही जोरदार धडक दिली. अपघाताच्या वेळी रोहित नशेत असल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. अपघातानंतर त्याने पलायन केलं होतं. मात्र त्याला अटक झाल्यानंतर जामिनही मंजूर झाला. रोहित हा आयआयटी दिल्लीच्या एका प्राध्यापकाचा मुलगा असून तो कायद्याचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.