संरक्षण मंत्रालयाकडून 7.4 लाख रायफल्स खरेदीचा निर्णय
एबीपी माझा वेब टीम | 14 Feb 2018 07:52 AM (IST)
एकूण 15 हजार 935 कोटी रुपये किमतीची शस्त्रास्त्रं भारतीय सैन्याला मिळणार आहेत.
नवी दिल्ली : जम्मू काश्मिरच्या सुंजवाँ भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षण मंत्रालयानं सात लाख 40 हजार नव्या रायफल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही दलातील जवानांना असॉल्ट रायफल्ससह 5 हजार 719 स्निपर रायफल्स आणि लाईट मशिन गन्स मिळणार आहेत. एकूण 15 हजार 935 कोटी रुपये किमतीची शस्त्रास्त्रं भारतीय सैन्याला मिळणार आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. भूदल, वायूदल आणि नौदल या तिन्ही दलातील जवानांना 12 हजार 280 कोटी रुपये किमतीच्या सात लाख 40 हजार नव्या रायफल्स देण्यात येतील. 'बाय अँड मेक इंडियन' वर्गवारी अंतर्गत या रायफल्स सैनिकांना दिल्या जातील. म्हणजेच कुठलीही भारतीय कंपनी काही बंदुका एखाद्या परदेशी कंपनीकडून थेट विकत घेऊन भारतात उर्वरित बंदुका तयार करु शकेल. या रायफल्स 7.62 एमएमच्या असतील. गेल्या दहा वर्षांपासून सैन्यासाठी असॉल्ट रायफल्स खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र कुठल्या न कुठल्या कारणामुळे ती दरवेळी रद्द करण्यात येत होती. गेल्या वर्षीही सरकारने या रायफल्सची खरेदी प्रक्रिया रद्द केली होती. असॉल्ट रायफल्स फ्रंटलाईन सैनिकांना देण्यात येतील, असं लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितलं. सोबतच 1819 रुपये किमतीच्या लाईट मशीन गन (एलएमजी) खरेदी करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या बंदुका सीमेवरील जवानांना देण्यात येतील.