नवी दिल्ली : भारत-चीन सीमा वाद हा गंभीर प्रश्न आहे. दोन्ही देश शांततेत हा प्रश्न मिटवण्यावर सहमत आहेत. केवळ शांततापूर्ण संवादच या वादाचं निराकरण करेल. चीनने अनेक वेळा एलएसीवर स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र आपल्या सैनिकांनी त्यांना यात सफल होऊ दिलं नाही, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. ते लोकसभेत बोलत होते.


कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार


देशाचं सुरक्षा दल कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात 15 जून रोजी चीनच्या सैनिकांनी स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हा प्रयत्न आपल्या सैनिकांनी उधळून लावला. यामध्ये आपले अनेक सैनिक शहीद झाले. त्याचवेळी चीनचंही मोठं नुकसान झालं. दोन्ही देशांनी एलएसीचा आदर केला पाहिजे, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.


India China Faceoff | 45 वर्षांत प्रथमच भारत-चीन हिंसक संघर्षात सैनिक शहीद


राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला जाऊन आपल्या सैनिकांची भेट घेतली. आपण सैनिकांच्या सोबत उभे आहोत हा संदेश यातून सर्वांना दिला. मी सुद्धा लडाखला गेलो आणि सैनिकांना प्रोत्साहन दिलं. चीनने लडाखमधील सुमारे 38000 चौरस किलोमीटर जागेवर अनधिकृत कब्जा केला आहे, याची सर्वांना माहिती आहे. तसेच 1963 मध्ये तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्तानने पीओकेची 5180 चौरस किलोमीटरची जमीन बेकायदेशीरपणे चीनला दिली, असं राजनाथ सिंह म्हणाले.


भारत-चीन सीमा परिसरामध्ये रेखांकित एलएसी नाही आणि एलएसीबद्दल दोन्ही देशांची मत भिन्न आहेत. विरोधकांनी भारत-चीन वादावर चर्चा करण्याची मागणी केली होती, त्यानंतर राजनाथ सिंह यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे. राजनाथ यांनी नुकतीच मॉस्को येथे चीनचे संरक्षणमंत्री वेई फेन्गे यांची भेट घेतली होती.