नवी दिल्ली : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर शुक्रवारपासून फास्टॅग लेन सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांना आता टोल नाक्यांवरच्या रांगेत थांबण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा प्रवास आता न थांबता सुसाट करु शकता.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयने इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रणालीमध्ये पहिलं यश मिळवलं आहे. शुक्रवारपासून सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग लेन चालू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारक आता न थांबता प्रवास करु शकतात, असं रस्ते परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

फास्टॅग हा आरएफआयडी टॅग आहे. बँकांच्या माध्यमातून ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने ही सेवा उपलब्ध आहे. हजारो वाहनधारकांनी गेल्या दोन दिवसात फास्टॅग लेनसाठी अॅप डाऊनलोड केलं असल्याचं रस्ते परिवहन मंत्रालयाने म्हटलं आहे.

दरम्यान 31 ऑगस्ट 2017 पर्यंत फास्टॅगची संख्या 18 टक्क्यांनी वाढली आहे. सरकारने 1 ऑक्टोबर 2017 पासून विक्री केल्या जाणाऱ्या सर्व वाहनांवर फास्टॅग असणं अनिवार्य केलं आहे.