Gujarat Morbi Bridge Collapse : गुजरातमधील मोरबीत झुलता पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. पूल नदीत कोसळला तेव्हा तिथे जवळपास पाचशे लोक उपस्थित होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 60 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या दुर्घटनेबाबत दुख व्यक्त केले आहे. 






तीन ते चार दिवसापूर्वीच या पूलाची दुरुस्ती केली होती.  माच्छू नदीच्या किनाऱ्याला छठ पूजेला अनेक लोक येथे उपस्थित होते. त्याचवेळी झुलता पूल कोसळल्याची दुर्घटना घडली. यामुळे पुलावर असणारे सर्वजण नदीत पडले. घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य वेगानं सुरु करण्यात आलं. स्थानिक पोलीस आणि अग्निशामन दलासह इतर बचाव कार्याच्या तुकड्या घटनास्थळी पोहचल्या. त्याशिवाय रुग्णवाहिकाही पोहचल्या. जखमींवर उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून आहेत. 


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  पीएमएनआरएफ (PMNRF) मधून ही मदत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.





 
गृहमंत्री अमित शहा यांनीही मोरबी येथील अपघातावर शोक व्यक्त केला आहे. या संदर्भात गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी आणि इतर अधिकाऱ्यांशी बोलल्याचे त्यांनी सांगितले आहे. स्थानिक प्रशासन पूर्ण तयारीनिशी मदतकार्यात गुंतले आहे. एनडीआरएफही लवकरच घटनास्थळी पोहोचत असल्याचं अमित शाह यांनी म्हटले आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. गांधीनगर आणि बडोद्यावरन एनडीआरएफची तीन पथके घटनास्थळाकडे रवाना झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी दुरुस्त करण्यात आलेल्या या पूलाला नगरपालिकेकडून फिटनेस सर्टिफिकेट मिळालं नव्हतं. तरिही या पूलाचा वापर करण्यात येत होता. 














या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री बूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, "मोरबीमध्ये केबल पूल कोसळल्यामुळे दुर्घटना झाली आहे, याचं मला दु:ख वाटत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेहण्याचं काम सुरु आहे. जखमींवर तात्काळ उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनासोबत संपर्कात असून बचावकार्य आणि दुर्घटनेची माहिती घेत आहे."