रायपूर : "आई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आज कदाचित मी जिवंत राहू शकणार नाही. तरी मृत्यू समोर असूनही मला आज भीती वाटत नाही," हृदय पिळवटून टाकणारे हे शब्द दूरदर्शनच्या टीममध्ये सामील असलेल्या मोरमुकुट शर्माचे आहेत. छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवादी हल्ल्यावेळी त्याने हा मेसेजे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. मोरमुकुट शर्मचा सहकारी कॅमेरामन अच्युतानंद साहूचा या हल्ल्यात मृत्यू झाला. तर दोन पोलीसह शहीद झाले आहेत.


छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये मंगळवारी (30 ऑक्टोबर) नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. नक्षल्यांनी पोलीस आणि मीडियावर निशाणा साधला. या हल्ल्यात दोन पोलीस आणि दूरदर्शनच्या एका कॅमेरामनसह तिघांचा मृत्यू झाला. तर मोरमुकुट शर्मा हे मृत्यूच्या दाढेतून बचावले आहेत. मीडियाची एक टीम काही पोलिसांसह एका गावाच्या दिशेने जात असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केला.

दूरदर्शनच्या टीमवर हल्ला झाल्यानंतर, काही क्षणातच लायटिंग सहाय्यक मोरमुकुट शर्माने त्याचा मोबाईल काढला आणि आईसाठी एक मेसेज रेकॉर्ड केला. या व्हिडीओमध्ये मोरमुकुट शर्मा जमिनीवर पडलेले दिसत आहेत. यादरम्यान त्यांच्या आजूबाजूला सुरु असलेल्या गोळीबाराचा आवाजही ऐकायला येतो.


"हल्ला सुरु झाला आहे," असं सांगत मोरमुकुट शर्मांनी व्हिडीओ मेसेजची सुरुवात केली. "आम्ही निवडणुकीच्या कव्हरेजसाठी दंतेवाडामध्ये आलो होता. आम्ही रस्त्यावर होतो. जवान आमच्यासोबत होते. अचानक नक्षलवाद्यांनी आम्हाला चहूबाजूंनी घेरलं. आई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. या हल्ल्यात कदाचित माझा जीव जाईल. पण माहित नाही का, मृत्यू समोर असूनही मला भीती वाटत नाही. इथे वाचणं कठीण आहे. 6-7 जवान सोबत आहे. चहूबाजूंनी वेढलो आहोत. आता मी हेच सांगू शकतो," एवढं बोलून त्यांनी आपला मेसेज संपवला.