Dawood Ibrahim in Pakistan: पाकिस्तानमध्ये एकानंतर एक अशा चार बड्या दहशतवाद्यांची अज्ञातांनी हत्या केल्यानंतर पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयची (ISI) झोप उडाली आहे. या चार दहशतवाद्यांना कुणी मारलं हे अद्याप समोर आलं नाही. त्यामुळे ISI कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती समोर येत आहे. दाऊदला स्पेशल कमांडोची सुरक्षा देण्यात आली असून त्याच्या निवासस्थानाच्या सुरक्षेतही वाढ केल्याची चर्चा आहे. दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्ये असून त्याला आयएसआयची सुरक्षा असल्याची माहिती आहे. तसेच इतर काही दहशतवाद्यांच्या सुरक्षेतही पाकिस्तानने वाढ केल्याची माहिती समोर येत आहे. 


दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये खलिस्तानी कमांडो फोर्सचा प्रमुख परमजीत सिंग पंजवार यांची लाहोरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याआधी इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट IC 814 अपहरण करण्याच्या बदल्यात सुटका करण्यात आलेला कुख्यात दहशतवादी जहूर मिस्त्री याचीही कराचीतील अख्तर कॉलनी येथील घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरही जहूर मिस्त्रीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता. त्याआधी काश्मीरमधील अल बद्र नावाच्या दहशतवादी संघटनेचा माजी कमांडर खालिद रझा याचीही पाकिस्तानातील कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती.


खालिद हा काश्मीरमध्ये दहशतवादी कमांडर होता. यानंतर तो कराचीला गेल्याची माहिती आहे. कराचीमध्ये तो खाजगी शाळांच्या फेडरेशनचा उपाध्यक्ष होता. कराचीमध्ये राहत असताना त्याने दहशतवाद्यांची भरती केल्याची माहिती आहे. याआधी हिजबुलचा दहशतवादी बशीर पीर रावळपिंडीत ठार झाला होता. जानेवारीमध्ये भारत सरकारने घोषित केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत त्याला टाकण्यात आले आणि काश्मीरमधील त्याची मालमत्ताही जप्त करण्यात आली.


एकामागोमाग चार दहशतवाद्यांना ठार मारल्याने आयएसआयला धक्का बसला आहे. यानंतर पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांची सुरक्षा वाढवली आहे. कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमच्या संरक्षणासाठी पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. दाऊदला पाकिस्तानी लष्कराने एक बुलेट प्रूफ वाहन आणि टीम दिली असल्याची माहिती आहे. 


दाऊद इब्राहिम हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असून घटनेपासून तो पाकिस्तानमध्ये आश्रय घेत आहे. तिथे बसून दाऊद भारतातही आपले काळे धंदे चालवत आहे. 


गुप्तचर अहवालानुसार, कारागृहात कथितरित्या उपस्थित असलेल्या सय्यद सलाहुद्दीनसह इतर काही दहशतवादी नेत्यांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. जेणेकरून कारागृहात असताना त्यांच्यावर कोणताही हल्ला होऊ नये.


तेहरिक-ए-तालिबानवर हत्येचा संशय


या दहशतवाद्यांच्या हत्येत तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेसह अन्य काही दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा संशय पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला आहे. मारले गेलेले आणि आता ज्यांना संरक्षण पुरवण्यात आलेले असे सर्व दहशतवादी भारतात वॉन्टेड आहेत, त्यांना पाकिस्तानने आश्रय दिला आहे.


या बातम्या वाचा: