नवी दिल्ली : भारतासाठी 'मोस्ट वाँटेड' असलेल्या दाऊद इब्राहिम, हाफिज सईद, मसूद अझहर आणि झकी-उर-रेहमान लख्वी यांना देशानं आता 'दहशतवादी' घोषित केलं आहे. नुकत्याच लागू करण्यात आलेल्या सुधारीत 'युएपीए' (अवैध कारवाया प्रतिबंधक कायदा, 2019 ) कायद्यांतर्गत पहिल्यांदाच अशा प्रकारे कुठल्याही व्यक्तींना दहशतवादी ठरवलं गेलं आहे.

यातील हाफिज सईद हा 'लष्कर ए तैय्यबा'चा म्होरक्या, मसदूर अजहर हा  'जैश ए मोहम्मद'चा प्रमुख तर झकी-उर-रेहमान हाही  'लष्कर ए तैय्यबा'शी संबंधित आहे. 1993 च्या मुंबई स्फोटांनंतर पाकिस्तानात पळालेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा या यादीतला चौथा 'दहशतवादी' ठरलाय. या चौघांपैकी हाफिज सईद आणि मौलाना मसूद अजहर यांना अमेरिका, संयुक्त राष्ट्र संघ आणि युरोपीयन संघानं यापूर्वीच जागतिक दहशतवादी ठरवलं आहे.

 सुधारीत अवैध कारवाया प्रतिबंधक कायदा, 2019 अन्वये केंद्र आणि राज्य सरकारांना एखाद्या व्यक्तीला दहशतवादी ठरवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. याद्वारे सरकारकडून त्या व्यक्तीची संपत्तीही जप्त करता येऊ शकते. गेल्या महिन्यातच हा सुधारीत कायदा पारित करण्यात आला. पूर्वीच्या कायद्यात फक्त संघटनांनाच दहशतवादी घोषित करता येत असे.