नवी दिल्ली : कर्नाटकमधील काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांना ईडीने (सक्तवसुली संचालनालय) अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. चौकशीकरता ही अटक झाल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


ईडीचे अधिकारी बुधवारी (उद्या) शिवकुमार यांना कोर्टासमोर हजर करणार आहेत. सुनावणीवेळी ईडीकडून शिवकुमार यांच्या कोठडीची मागणी केली जाईल. ईडीने शिवकुमार आणि नवी दिल्लीतल्या कर्नाटक भवनमधील कर्मचारी हनुमनथैया यांच्यासह अन्य काही जणांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

अटकेनंतर शिवकुमार यांनी ट्विटरद्वारे केंद्र सरकारविरोधातला संताप व्यक्त केला आहे. शिवकुमार यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी माझ्या भाजपमधील मित्रांचं अभिनंदन करु इच्छितो, कारण मला अटक करण्याचं त्यांचं मिशन अखेर यशस्वी झालं आहे. माझ्याविरोधातील आयटी आणि ईडीची प्रकरणं ही राजकीय वैमनस्यातून दाखल करण्यात आली आहेत. मी त्यांच्या राजकारणाचा शिकार आहे.




दरम्यान, शिवकुमार यांच्या अटकेविरोधात कर्नाटक काँग्रेस उद्या राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे.