बंगळुरु : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंगळुरुमध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत हा निर्णय घेण्यात आला.  65 वर्षीय दत्तात्रय होसबळे हे संघाचे 2009  पासून सह-सरकार्यवाह म्हणून काम पाहत होते. दत्तात्रय होसबळे हे मूळ कर्नाटकमधील आहेत. त्यामुळे दत्तात्रय होसबळे यांनी संघाचे प्रचारक बनून पूर्णकालीन संघाचेच काम  केले आहे. दत्ताजी होसबळे हे स्वतः त्यांच्या शिक्षणाच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होते आणि नंतर संघाने त्यांना  जवळ जवळ 15 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून काम दिले. 


या काळात विद्यार्थी परिषदेचा देशाच्या पूर्वोत्तर भागापासून तर अंदमान निकोबार पर्यंत मोठा विस्तार झाला. ज्याचे श्रेय दत्तात्रय होसबळेंना दिले जाते. त्यामुळेच होसबळे यांना अनेक वेळा संघाचे तरुण नेतृत्व म्हटल्या जाते. गुवाहाटी येथील युवा विकास केंद्र स्थापन करण्यात देखील त्यांचा मोठा हात आहे.  


त्यांना साल 2004 मध्ये संघाने बौद्धिक प्रमुख देखील बनवले. दत्तात्रय होसबळे हे इंग्लिश लिटरेचर मध्ये पदव्युत्तर असून त्यांचे संस्कृत आणि त्यांची मातृभाषा कन्नड आहे याशिवाय  अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. देशविदेशात त्यांनी संघाची विचारधारा वेगवेगळ्या कार्यक्रमात मांडली आहे.  नेपाळ भूकंपाच्या वेळी स्वतः तिथे जाऊन त्यांनी सेवाकार्यात मदत केली होती. 


दत्तात्रय होसबळे हे इंडियन पॉलिसी फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त आहेत. ही संघटना एनजीओ असून दिल्लीत आहे. सामाजिक अभ्यास आणि संशोधनाद्वारे समाजाला इतिहासाचे अॅनॅलिसिस, आजची परिस्थितीचे योग्य आकलन करायला मदत आणि उद्या येणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून देणे हे इंडियन पॉलिसी फाऊंडेशनचे ध्येय आहे. 


विद्यार्थी काळात लादलेल्या आणीबाणीत दत्तात्रय होसबळे हे मिसा कायद्या अंतर्गत जेलमध्ये होते. कन्नड भाषेतील असिमा नावाच्या मासिकाचे ते संस्थापक संपादक ही आहेत.