Cyclone Mandous Weakens in Tamil Nadu : तामिळनाडूतील (Tamil Nadu) किनारपट्टी ओलांडल्यानंतर मंदोस चक्रीवादळाचा (Mandous Cyclone) जोर कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात मंदोस चक्रीवादळाचं अस्मानी संकट पाहायला मिळत आहे. मंदोस चक्रीवादळ चेन्नईच्या किनाऱ्यावर धडकलं, त्यानंतर शनिवारी तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला. तामिळनाडूमध्ये चक्रीवादळामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रावरही चक्रीवादळाचा परिणाम झाला असून 11 ते 13 डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
तामिळनाडूला मंदोस चक्रीवादळाचा फटका बसला आहे. मात्र आता तामिळनाडू किनारपट्टी ओलांडल्यानंतर मंडोस चक्रीवादळाचा जोर कमी झाला आहे. तामिळनाडूमध्ये सध्या बचावकार्य राबवलं जात असून वादळामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बचावकार्यासाठी एकूण 25,000 कर्मचारी तैनात आहेत. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनसह नागरी संस्थांकडून प्रशासनाच्या मदतीने पडलेली झाडे हटवण्याचं काम सुरु आहे.
मंदोस चक्रीवादळ शनिवारी पहाटे चेन्नई किनारपट्टीवर धडकलं. चक्रीवादळानं समुद्र किनाऱ्यावर तांडव घातलं. चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे काही घरांचे नुकसान झाले आहे. असं असलं तरी वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाचा फटका कमी बसला आणि जास्त नुकसान झालं नाही. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी बाधित भागांना भेट दिली आणि बाधितांना अत्यावश्यक वस्तूंचं वाटप केलं. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सांगितलं की, चक्रीवादळामुळे जास्त नुकसान झालेलं नाही.
स्थलांतरीत नागरिकांना मदत छावण्यांमध्ये आश्रय
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (M K Stalin) यांनी सांगितलं की, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात असून गरज भासल्यास केंद्राची मदत घेतली जाईल. चक्रीवादळामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, या घटनांमुळे सुमारे 181 घरांचं नुकसान झाले असून इतर प्रकारच्या नुकसानीची माहिती गोळा केली जात आहे. सुमारे 3163 कुटुंबातील 9130 लोकांना 201 मदत छावण्यांमध्ये आश्रय देण्यात आला आहे.
बचावकार्यासाठी 25 हजार कर्मचारी तैनात
ग्रेटर चेन्नई कॉरपोरेशन म्हणजे पालिकेसह सामाजिक संस्थांकडून बचावकार्य सुरु आहे. मदत आणि बचावकार्यासाठी एकूण 25,000 कर्मचारी तैनात आहेत. तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे 496 जवानांकडूनही बचाव आणि मदतकार्यात सुरु आहे. चक्रीवादळामुळे अनेक भागात विजेचे खांब आणि ट्रान्सफॉर्मर कोसळले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा आता पूर्ववत करण्यात आला आहे. अनेक घरे आणि बोटींचे नुकसान झाले आहे.