भुवनेश्वर : मुसळधार पाऊस आणि 175 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह 'फनी' चक्रवादळाने काल सकाळी ओदिशाच्या किनाऱ्यावर धडक दिली. या वादळामुळे ओदिशात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून पूर्व किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओदिशातील पूर्वेकडील 15 ते 16 जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मोबाईल नेटवर्क, वीजेसारख्या गरजेच्या सेवा ठप्प आहेत.

हवामान विभागाने ओदिशा, पश्चिम बंगाल आणि आपपासच्या राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास परवानगी नाकारली आहे.

फनी चक्रीवादळाने सकाळी साधारण साडेआठ वाजण्याच्या सुमारास ओदिशामधील पुरी येथील समुद्र किनाऱ्यावर धडक दिली. जोरदार पावसामुळे किनारपट्टीलगतच्या मोठ्या परिसरात पाणी साचले आहे. वादळाचा मोठा फटका बसलेल्या पूर्वेकडील गावांमध्य़े मदतकार्य सुरु आहे.

VIDEO | फनी वादळाची भयानक दृश्यं, चार तास वादळाचा तांडव | ओडिशा | एबीपी माझा



बांग्लादेशमध्ये या वादळाला फनी (बंगालीमध्ये फोनी)असे नाव देण्यात आले आहे. फनी किंवा फोनी म्हणजे सापाचा फणा.

दुपारी एकनंतर विमान वाहतूक सुरु होण्याची शक्यता
भुवनेश्वर विमानतळ प्रशासनामधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, चक्रीवादळामुळे भुवनेश्वर विमानतळावरील उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. दुपारी एकनंतर भुवनेश्वरहून विमान वाहतूक सुरु होण्याची शक्यता आहे.

VIDEO | ओडिशाच्या किनारपट्टीवरील 'फनी' वादळाचा कसा आहे प्रवास? | एबीपी माझा