मुंबई : बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारच्या नागरिकत्वाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून देशभर चर्चा सुरु आहेत. आता अक्षय कुमारने स्वत: त्याच्या नागरिकत्वाबाबत भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 29 मे रोजी मुबंईत अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानेही मतदान केलं. मात्र अक्षय कुमार कुठेही दिसला नाही.


त्यानंतर अक्षय कुमारला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. ट्रोलर्सकडून अक्षय कुमारच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. अखेर यावर अक्षय कुमारने मौन सोडत, ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.


अक्षयने आपली बाजू मांडताना म्हटलं की, '' मला माझी देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही. अनेकांकडून माझ्या नागरिकत्वाबाबत उगाचच रुची दाखवली जात आहे आणि सातत्यानं त्यावरुन वाद निर्माण केला जात आहे. मी माझं नागरिकत्व कधीही लपवलेलं नाही आणि ते कधी नाकारलेलं नाही. मात्र मी गेल्या सात वर्षांपासून कॅनडाला गेलो नाही, ही गोष्टही खरी आहे. मी भारतात काम करतो आणि भारतातील सर्व कर भरतो. एवढ्या वर्षात मला कधीही भारताप्रती असलेलं प्रेम सिद्ध करावं लागलं नाही."





मी निराश आहे की विनाकारण माझ्या नागरिकत्वावरुन वाद निर्माण केला जात आहे. हा एक खासगी, कायदेशीर आणि राजकीय मुद्दा आहे. मी देशासाठी छोटंसं योगदान देत आहे आणि देत राहीन. तसेच देश मजबूत करण्याचा प्रयत्न करत राहीन, असं अक्षयने म्हटलं.


अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. मात्र मुंबईत पार पडलेल्या मतदानादरम्यान अक्षय कुमार कुठेही मतदान करताना दिसला नाही. त्यावरुन अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक असल्याने मतदान केलं नसल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होत्या. त्यानंतर अक्षयने आज या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली.