मुंबई: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचं आता तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा किनारपट्टीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. असं असलं तरी हे चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला धडकण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जातंय. मात्र हे चक्रीवादळ किनारपट्टीला समांतर पुढे सरकत जाणार आहे. त्यामुळे 10 मे  आणि 11 मे रोजी पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  


बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. या चक्रीवादळाला श्रीलंकेनं असनी हे नाव दिलं आहे. येत्या आठवड्यात असनी चक्रीवादळ आंध्र प्रदेश, ओडिशात धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 11 मे रोजी असनी चक्रीवादळ आपला मार्ग बदलत भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या समांतर पुढे सरकणार आहे. तर 12 मे रोजी चक्रीवादळ कमकुवत होत डीप डीप्रेशनमध्ये परावर्तित होईल. 10 मे आणि 11 मे रोजी आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका हा ओडिशाला बसण्याची शक्यता आहे. 


चक्रीवादळाच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा वेग ताशी 125 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. असनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसंच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना परतण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 


 




बंगालच्या उपसागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान एप्रिल-मे दरम्यान सरासरीपेक्षा अधिक असते. सोबतच वाऱ्यांची स्थिती देखील अनुकूल असते, त्यामुळे या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होत असते. चक्रीवादळांचे मार्ग सामान्यतः वरील बाजूच्या वाऱ्यांद्वारे नियंत्रित केले जातात, ज्यामुळे चक्रीवादळात अनेक बदल बघायला मिळतात. यामुळेच कधी कधी चक्रीवादळाचा मार्ग देखील बदलत असतो.


डिसेंबर 2021 मध्ये जावाद चक्रीवादळ भारतात आले होते. त्याआधी गुलाब चक्रीवादळ सप्टेंबर 2021 मध्ये धडकले, तर मे 2021 मध्ये, यास चक्रीवादळाने बंगाल, बिहारसह अनेक राज्यांमध्ये कहर केला होता. 


महत्त्वाच्या बातम्या: