Electric Scooters Fire Reason: काही दिवसांपूर्वीच देशभरातील विविध भागात इलेक्ट्रिक दुचाकी पेट घेत असल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. स्कूटरला आग लागल्याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच इलेक्ट्रिक स्कूटरला आग का लागत आहे, याचे कारण मात्र कोणालाच माहित नव्हते. आता याचेच उत्तर मिळाले आहे. इलेक्ट्रिक दुचाकीच्या आगीच्या घटनांबाबत सरकारने गंभीर भूमिका घेत तपास सुरू केला होता. याचाच आता प्राथमिक अहवाल समोर आला आहे. ज्यात दुचाकीला लागणाऱ्या आगीबाबत नेमकं काय कारण आहे, हे सांगण्यात आले आहे.    


बॅटरी सेलमध्ये दोष हे आहे मुख्य कारण


सरकारच्या प्राथमिक तपासात इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचे कारण बॅटरी सेल आणि मॉड्युल्सचा दोष असल्याचे सांगण्यात आले आहे. रॉयटर्सने दोन सरकारी सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, सरकारने तीन कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या घटनेची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) आणि ओकिनावा (Okinawa) यांचा समावेश आहे.


Ola आणि Okinawa मध्ये आढळली ही त्रुटी 


अहवालात दावा करण्यात आला आहे की, ओला स्कूटरला आग लागल्याचे कारण बॅटरी सेल आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टममधील बिघाड आहे. तर ओकिनावाच्या बाबतीत, बॅटरी सेल आणि बॅटरी मॉड्यूल्सशी संबंधित दोष आढळले. त्याचबरोबर प्युअर ईव्हीच्या स्कूटरला आग लागल्याचे कारण बॅटरीचे केसिंग योग्य नसल्याचे सांगण्यात आले आहे.


येत्या दोन आठवड्यांत अंतिम अहवाल होणार सादर 


पुढील दोन आठवड्यांत तपासाचा अंतिम अहवाल येईल, असा दावा वृत्तात करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी सरकारने तिन्ही कंपन्यांच्या बॅटरी सेलचे नमुने घेतले आहेत. दरम्यान, ओला इलेक्ट्रिकने दावा केला आहे की, त्यांच्या फक्त एका स्कूटरमध्ये थर्मल समस्या दिसल्या आहेत. तसेच कंपनीच्या बॅटरी व्यवस्थापन प्रणालीमध्ये कोणताही दोष नसल्याचे ओलाने सांगितले आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI