कोलकाता/भुवनेश्वर : पश्चिम बंगालमध्ये बुधवारी (20 मे) ताशी 190 किमी वेगाने आलेल्या अम्फान चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. या वादळामुळे सुमारे 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं. अम्फान चक्रीवाद काल दुपारी अडीचच्या सुमारास पश्चिम बंगालमधील दीघा आणि बांगलादेशमध्ये हटिया बेटाच्या किनाऱ्यावर धडकलं. चक्रीवादळामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात मोठं नुकसान झालं. मोठ्या संख्येने वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडले, घरांचीही पडझड झाली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "बंगालचं झालेलं नुकसान शब्दात सांगता येणार नाही. किमान 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला आहे. नेमकं किती नुकसान झालं याचा अंदाज बांधण्यासाठी अजून काही दिवस लागतील.
ओडिशामध्ये तीन जणांनी प्राण गमावले
पश्चिम बंगालच्या तुलनेत ओदिशामध्ये चक्रीवादळाचा कहर काहीसा कमी दिसला. ओदिशाच्या बालासौर, भद्रक आणि केंद्रपाडामध्ये सर्वाधिक परिणाम दिला. या परिसरांमध्ये हवेचा वेग ताशी 110 किमीपेक्षा जास्त नव्हता. तरीही ओडिशामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं.
जवळपास सात लाख जणांना सुरक्षित स्थळी हलवलं
चक्रीवादळ धडकण्यापूर्वी प्रशासनाने पश्चिम बंगाल आणि ओदिशामधील जवळपास 6 लाख 58 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकण्याच्या वेळी चक्रीवादळाच्या केंद्राजवळ हवेचा वेग ताशी 160-170 किमी होता. हावडा आणि उत्तरेकडील 24 परगना जिल्ह्यात वृक्ष उन्मळून पडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
एनडीआरएफचे संचालक एस एन प्रधान यांनी सांगितलं की "ओदिशामध्ये 20 पथकं तैनात केली आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये 19 पथकं तैनात आहेत. ओदिशामध्ये एनडीआरएफच्या पथकांनी रस्ते रिकामे करण्याची मोहीम सुरु केली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तैनात असलेल्या पथकांनीही नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सुमारे पाच लाख आणि ओदिशात सुमारे 1.58 लाख लोकांना सुरक्षित स्थळी नेलं आहे.
आसाममध्ये चक्रीवादळ शांत होईल
दरम्यान हवामान विभागाने चक्रीवादळाच्या वाटचालीचा पुढचा अंदाज जारी केला होता. यानुसार अम्फान चक्रीवादळ ताशी 60 ते 70 किमी वेगाने बांगलादेशात पोहोचून यानंतर बांगलादेशच्या सीमेवरुन बाहेर पडत मेघालय आणि आसाममध्ये शांत होईल.