श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात बेळगावच्या सुपुत्राला वीरमरण
एबीपी माझा वेब टीम | 04 Apr 2017 06:25 PM (IST)
प्रातिनिधीक फोटो
बेळगाव : खानापूर तालुक्यातील बैलूर गावच्या सुपुत्राला श्रीनगरमध्ये वीरमरण आलं आहे. बसप्पा बजंत्री असं या जवानाचं नाव असून ते सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बसप्पा बजंत्रीसह आणखी सहा जवान जखमी झाले आहेत. बसप्पा आपल्या सहकाऱ्यासोबत ट्रकमधून श्रीनगरहून जम्मूकडे परतत असताना ही घटना घडली. श्रीनगरमध्ये होत असलेल्या पोट निवडणुकीतील बंदोबस्तासाठी त्यांना तैनात करण्यात आलं होतं. दशहतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सहा जवान जखमी झाले आहेत, तर बसप्पा यांना वीरमरण आलं. बसप्पा गेली 16 वर्ष सीआरपीएफमध्ये सेवा बजावत होते. या घटनेची माहिती बैलूर या गावी समजल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. बैलूरमध्ये शासकीय इतमामात मंगळवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. त्यांचं पार्थिव दिल्लीहून गोवामार्गे बैलूरला आणलं जाणार आहे.