भारतातील सर्वात मोठं निमलष्करी दल सीआरपीएफच्या विशेष महासंचालक श्रेणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधित एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागणं झाल्याचं समोर आलं. त्यानंतर प्रशासनानं तातडीनं सीआरपीएफचं कार्यालय सील करण्याची कार्यवाही हाती घेतली. आता संपूर्ण इमारत सॅनिटाईझ केल्याशिवाय ही इमारत सुरु केली जाणार नाही, अशी देखील माहिती आहे.
सीआरपीएफच्या जिल्हा निरीक्षक अधिकाऱ्यांना वैद्यकीय नियमावलीनुसार प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. कोरोनाग्रस्त अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे.
देशात आतापर्यंत सीआरपीएफचे 136 आणि बीएसएफचे 17 जवान कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.
एकाच इमारतीत 41 जणांना कोरोनाची लागण
दाटीवाटीनं घरं असलेल्या भागात योग्य काळजी घेतली नाही तर कोरोनाचा कसा भडका उडू शकतो याचं एक धक्कादायक उदाहरण दिल्लीत काल पाहायला मिळालं. दिल्लीतल्या कापसहेडा परिसरात एकाच इमारतीत 41 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीतल्या दक्षिण पश्चिम दिल्ली परिसरातल्या कापसहेडामध्ये ज्या ठिकाणी मजूर, व इतर कामगार दाटीवाटीनं राहतात तिथं 18 एप्रिलला एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडला. त्यानंतर प्रशासनानं या परिसरातल्या लोकांची चाचणी केल्यानंतर 41 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार उजेडात आलाय. कापसहेडा हा हरियाणाला लागून असलेला भाग आहे. या परिसरात काम करणारे अनेक गरीब मजूर या ठिकाणी दाटीवाटीनं राहतात. कापसहेडाच्या ठेकेवाली गलीत जवळपास 175 खोल्या आहेत. इथे 18 एप्रिलला एक कोरोनाग्रस्त सापडल्यानंतर प्रशासनानं तातडीनं ही गल्ली सील केली होती. एरव्ही एका परिसरात 3 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त सापडल्यावर इमारत पूर्णपणे सील होते. पण कापसहेडामध्ये अगदी चिंचोळ्या भागात एकाला एक लागून खोल्या आहेत. जवळपास सव्वा लाख मजूर या ठिकाणी राहतात. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं एक रुग्ण सापडल्यावरच इथली संपूर्ण गली सील केली होती.