मुंबई : कोविशिल्ड (Covishield) कोरोना लस घेतलेल्या प्रत्येकामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. ॲस्ट्राझेनेकाने (AstraZeneca) कंपनीने कोविशिल्ड (Covishield) लसीच्या दुष्परिणामांबाबत खुलासा केल्यापासून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कोविशिल्ड लसीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं असून चौकशीसाठी समितीची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, आयसीएमआरच्या माजी शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, कोविशिल्ड लसीपासून भारतात धोका खूपच कमी आहे.
तुम्हीही कोविशिल्ड लस घेतलीय?
सध्या लोकांना कोरोना लसीच्या नावाने भीती वाटू लागली आहे. ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीची कोविशिल्ड (Covishield) लस घेतलेल्या अनेकांचा रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे. ब्रिटनमधील अशा 81 लोकांची यादी न्यायालयात सादर करण्यात आली आहे. ब्रिटीश फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेकानेही (AstraZeneca) न्यायालयात खुलासा करत या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असल्याचं मान्य केलं आहे, मात्र हे फार क्वचित असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.
कोविशिल्ड लस घेतलेल्यांमध्ये भीतीचं वातावरण
ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीच्या खुलाशानंतर कोरोनाची लस घेणाऱ्या लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ॲस्ट्राझेनेकाने कंपनीने न्यायालयात कबूल केले आहे की, कोविशिल्डमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) म्हणजेच थ्रोम्बोसिस होऊ शकते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेटची संख्या कमी होते. थ्रोम्बोसाइटोपेनियाच्या गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. ही माहिती समोर आल्यानंतर भारतातही या लसीबाबत चर्चा सुरू झाली.
ह्रदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोकचा कितपत धोका? जाणून घ्या
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीशी कराराअंतर्गत भारतात कोविशिल्ड (Covishield) लस तयार केली. कोविशिल्ड लस भारतात मोठ्या प्रमाणावर दिली गेली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. भारतातील बहुतेक आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, हा धोका फक्त दुर्मिळ प्रकरणांमध्येच होऊ शकतो. सीरम इन्स्टिट्यूटने ऑगस्ट 2021 मध्ये कोविशिल्ड लस दिल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी त्यांच्या वेबसाइटवर माहिती दिली होती. यामध्ये थ्रोम्बोसाइटोपेनिया किंवा कमी प्लेटलेट काउंटमुळे रक्त गोठण्याची समस्या उद्भवू शकते, असे कंपनीने म्हटले आहे. हे एक लाखापैकी एका व्यक्तीमध्ये होऊ शकते आणि हे अत्यंत दुर्मिळ प्रकरण असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
विनाकारण घाबरण्याची गरज नाही
आयसीएमआरचे (ICMR) माजी महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी कोविशिल्ड (Covishield) लसीबद्दल सांगितलं की, लस घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम जास्तीत जास्त तीन ते चार आठवडे टिकू शकतात. तेही केवळ क्वचित वेळी. कोविशिल्ड लसीचे करोडो डोस भारतात दिले गेले आहेत, पण लसीचे दुष्परिणाम फारच कमी प्रकरणांमध्ये दिसून आले आहेत. लस दिल्यानंतर अडीच-अडीच वर्षांनी दुष्परिणाम होण्याचा धोका नसून विनाकारण घाबरण्याची गरज नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :