नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केलेल्या भाजपाच्या विद्यमान खासदार बृजभूषणसिंह (BrujBhushan singh) यांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपाने उत्तर प्रदेशातील उमेदवारांची यादी जाहीर केली असून कैसरगंज लोकसभा (Loksabha) मतदारसंघातून यंदा बृजभूषणसिंह यांना संधी देण्यात आली नाही. भाजपच्या स्थानिक निवड समितीकडून येथील जागेसाठी बृजभूषणसिंह यांचंच नाव देण्यात आलं होतं. मात्र, भाजपच्या (BJP) वरिष्ठ निवड समितीने खासदार सिंह यांचं तिकीट कापून त्यांच्याजागी त्यांचे सुपुत्र करण शरणसिंह यांना तिकीट दिलं आहे. विशेष म्हणजे बृजभूषणसिंह हे आपल्याला तिकीट मिळावं यासाठी आग्रही होते, पण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना संधी न देता थेट संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 


ऑलिंम्पिक विजेत्या कुस्तीगीरपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर खासदार आणि ऑल इंडिया कुस्ती संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष असलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध आंदोलन पुकारले होते. लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांसह इतर महिला कुस्तीपटूंनी मोदी सरकारला या आंदोलनातून चांगलेच धारेवर धरले होते.  विशेष म्हणजे महिला कुस्तीपटूंनी आपले ऑलिंम्पिक पदकही नदीत विसर्जित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्थानिक ग्रामस्थ व ज्येष्ठ नेत्यांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी पदक विसर्जित करण्याचा निर्णय बदलला. खासदार बृजभूषणसिंह यांच्यामुळे भाजपावर मोठी नामुष्कीची वेळ आली होती. 






ऑलिंपिकविजेत्या कुस्तीपटूंनी पुकारलेल्या आंदोलनास देशभरातून पाठिंबा मिळत होता. काँग्रेससह विरोधी पक्षांनीही भक्कमपणे आंदोलनात सहभागी होत मोदी सरकारच्या कार्यक्षमेतवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच, खासदार बृजभूषण शरणसिंह यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. मात्र, भाजपाने बृजभूषण शरणसिंह यांचा राजीनामा न घेतल्याने कुस्तीपटूंनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीत यंदा विद्यमान खासदार सिंह यांना तिकीट मिळणार की नाही, याची सर्वांनाच उत्सुकता होती. आता, भाजपाने बृजभूषण शरणसिंह यांचे तिकीट कापले आहे. 


भाजपाकडून उत्तर प्रदेशातील 2 उमेदवारांच्या नावांची आज घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, रायबरेली मतदारसंघातून दिनेश प्रतापसिंह यांना संधी देण्यात आली आहे. तर, कैसरगंज मतदारसंघातून करण भूषण सिंह यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे, विद्यमान खासदार बृजभूषण शरणसिंह यांचा पत्ता कापण्यात आला आहे. मात्र, भाजपाने त्यांच्याच घरात उमेदवारी देत एकप्रकारे त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, आता बृजभूषणसिंह नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


हेही वाचा


बीडमध्ये निवडणुकीला जातीय रंग, मराठा विरुद्ध ओबीसी कार्ड; अशी आहे जातनिहाय आकडेवारी