नवी दिल्ली: आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 7.5 लाखांच्या खाली राहिली आहे तर कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा 1.51 टक्के इतका झाला आहे.


देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा छत्तीसगड (0.96 ), झारखंड (0.87), आंध्र प्रदेश ( 0.82), तेलंगना (0.57), बिहार (0.49), आसाम (0.44), ओडिशा ( 0.43) आणि केरळ (0.34) या राज्यांचा कोरोना मृत्यूदर हा एक टक्क्यापेक्षा कमी आहे.
केंद्राने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा एक टक्क्याच्या खाली आणण्याचा सल्ला दिला आहे.


या आकडेवारीनुसार आज देशात 7,40,090 इतक्या कोरोनाच्या अॅक्टिव रुग्ण आहेत. हे प्रमाण एकूण कोरोना रुग्णांच्या 9.67 टक्के इतके आहे. याचसोबत भारतात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. गेल्या चोवीस तासात 61,775 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर याच कालावधीत 54,044 इतक्या नव्या रुग्णांची भर पडली आहे.


सातत्याने घेण्यात येणाऱ्या चाचण्या, योग्य आणि वेळेवर झालेले निदान यांमुळे देशातील कोरोनाच्या मृत्यूदरात सातत्याने घट होत आहे. आज कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.51 इतका आहे असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. आतापर्यंत 67,95,608 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण हे 88.81 वर पोहचले आहे.


आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या आकडेवारीत सांगितले आहे की नविन कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णापैकी 77 टक्के रुग्ण हे केवळ 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. कोरोनामुक्त होण्याच्या संख्य़ेत कर्नाटक राज्याने आता महाराष्ट्राला मागे टाकले आहे. गेल्या 24 तासात कर्नाटकात 8,500 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर महाराष्ट्र आणि केरळ राज्यात 7000 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नविन रुग्णांपैकी 8,000 पेक्षा जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्या खालोखाल कर्नाटक आणि केरळ मध्ये 6,000 च्या वर रुग्ण आहेत.


गेल्या 24 तासात कोरोनाचे 717 बळी गेले आहेत. त्यापैकी 82 टक्के बळी हे 10 राज्ये आणि केद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 213 बळी तर त्या खालोखाल कर्नाटकात 66 बळी गेले आहेत.
भारताच कोरोनाची एकूण संख्या ही 76,51,107 इतकी झाली असून कोरोना मृतांची संख्या ही एकूण 1,15,914 इतकी झाली आहे.