भोपाळ: मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे राजकीय वातावरण तापत आहे आणि नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांत भर पडत आहे. कमलनाथ यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता भाजपच्या मंत्र्यांकडून अशाप्रकारचं वक्तव्य करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या मंत्री उषा ठाकूर यांनी मदरशांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मदरशांना देण्यात येणारी सरकारी मदत बंद करावी, कारण सर्व दहशतवादी हे मदरशातूनच तयार होतात असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावरही टीका केली. कमलनाथ सरकार मंदिरांकडून जिझिया कर वसूल करत होते, असा आरोप त्यांनी केला.


आमच्या श्रमाचा पैसा असा वाया जाऊ नये
इंदूरमध्ये घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत उषा ठाकूर म्हणाल्या की, "मदरशांना देण्यात येणारी सरकारी मदत बंद करायला हवी. वक्फ बोर्ड ही संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था आहे. जर मदरशांना कोणी वैयक्तिक मदत करणार असतील तर त्यांनी ती खुशाल करावी, आपले संविधान त्याला मान्यता देते. पण आम्ही आमच्या मेहनतीने कमावलेल्या पैशाचा असा अपव्यय करु देणार नाही. तो पैसा विकासासाठी वापरला गेला पाहिजे."


मदरशातून दहशतवादी तयार होतात : उषा ठाकूर
मदरशातील शिक्षणावर टीका करताना त्या म्हणाल्या की, "मदरशात ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाते ते पाहता त्यातून दहशतवादी तयार होतात. त्यामुळे देशविरोधी कारवाया ज्या या मदरशातून तयार होतात, ते बंद करायला हवे आणि जनतेच्या श्रमाचा पैसा हा विकासासाठी वापरण्यात यावा."


यावेळी मंत्री उषा ठाकूर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की, "कमलनाथ यांच्या 15 महिन्यांच्या कार्यकाळात त्यांच्या सरकारने मंदिरांवर 10 टक्के जिझिया कर लावला होता. मंदिरातून मिळणाऱ्या पैशाचा वापर हा मंदिरांच्या विकासासाठी आणि इतर धार्मिक कार्यासाठी होतो. पण सरकारी तिजोरी भरायच्या उद्देशाने कमलनाथ यांनी हा जिझिया कर लावला आणि धार्मिक अखंडता तोडण्याचा प्रयत्न केला."


देशाची अखंडता भंग करण्याचा कमलनाथांचा प्रयत्न
यावेळी धर्मांतराच्या विषयावर उषा ठाकूर म्हणाल्या की, "कमलनाथांनी आदिवासी लोकांना असे सांगितले होते की त्यांनी स्वत:चा उल्लेख हिंदू असा करणे सोडावे. त्यामुळे कमलनाथ हे देशाची अखंडता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. वक्फ बोर्ड हा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे तरीही कमलनाथा सरकारने इमाम आणि मौलवी यांना पाच हजार रुपयांचे वेतन दिले जे सामान्य लोकांच्या खिशातून येते."


कॉंग्रेसवर टीका करताना त्या म्हणाल्या की, "केंद्र सरकारचा सीएए हा कायदा पाकिस्तानात अत्याचार होणाऱ्या अल्पसंख्याकाच्या संरंक्षणासाठी करण्यात आला आहे. पण कॉंग्रेस पक्षाचा सीएएला विरोध आहे."


Usha Thakur | सर्व दहशतवादी मदरशांमध्येच वाढले आहेत; मध्य प्रदेशच्या मंत्री उषा ठाकूर बरळल्या