नवी दिल्ली: केंद्र सरकारने भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिलासा दिला आहे. यापुढे आता भारतात यायचं असेल तर प्रवाशांना एअर सुविधा फॉर्म (Air Suvidha Form) भरण्याची गरज नाही. तसेच प्रवाशांना आरटीपीसीआर कोविड टेस्ट (RT-PCR) करण्याची अनिवार्यता केंद्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने तशा आशयाचं परिपत्रक जारी केलं असून हा निर्णय उद्यापासून म्हणजे 22 नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी विमानामधील मास्क सक्तीही सरकारने रद्द केली होती. त्यानंतर आता हा निर्णय घेतला असल्याने आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी अखेर बंद झाली आहे.
कोरोना काळात भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एअर सुविधा फॉर्म (Air Suvidha Form) भरण्याची सक्ती करण्यात आली होती. या माध्यमातून प्रवाशांच्या त्यावेळची आरोग्याची स्थिती कशी आहे याची सर्व माहिती गोळा करण्यात येत होती. त्याचसोबत प्रवाशांना वॅक्सिन सर्टिफिकेट आणि निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट भरावा लागायचा. नव्या नियमानुसार आता या दोन्ही गोष्टी करण्याची गरज नाही.
काय होता एअर सुविधी फॉर्म?
एअर सुविधा फॉर्ममध्ये (Air Suvidha Form) असलेल्या नियमांनुसार, परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व, पाच वर्षांहून अधिक वयाच्या प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी RT-PCR चाचणी करावी लागत असे. जगातील काही देशांमध्ये आरटीपीसीआर चाचणी करणे हे आर्थिकदृष्ट्या महाग आहे. मालदिवचा विचार करता RT-PCR चाचणी करण्यासाठी 7000 रुपयांचा खर्च येतो. केंद्र सरकारच्या ताज्या निर्णयामुळे आता या गोष्टी बंद होणार आहेत. त्यामुळे भारतात येणाऱ्या प्रवाशांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.
विमान प्रवाशांना मास्क सक्ती नाही
गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाची रुग्ण संख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याचं दिसून येतंय. त्यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मास्क घालणं बंधनकारक नसणार आहे. तसेच मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांना आता आर्थिक दंडदेखील लावण्यात येणार नाही. त्या संबंधित निर्देश केंद्र सरकारने जारी केलेले आहेत. असं जरी असलं तरी प्रवाशांनी मास्क वापरावा असा सल्ला मात्र देण्यात आला आहे.
ही बातमी वाचा: