नवी दिल्ली: देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आफताबच्या पॉलिग्राफी चाचणीला न्यायालयाने परवानगी दिली आहे. आफताबच्या नार्को चाचणीपूर्वी पॉलिग्राफी चाचणी करावी लागणार होती आणि त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक होती. ती अडचण आता दूर झाली असून पोलिस यंत्रणेला अपेक्षित उत्तरं मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आफताबच्या पॉलीग्राफी चाचणीला परवानगी दिली आहे. आता आफताबची पॉलिग्राफी चाचणी होणार असून ही चाचणी कधी होणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण आफताबची पॉलिग्राफी आणि त्यानंतर नार्को चाचणी येत्या दहा दिवसात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याशिवाय दिल्ली पोलिसांना जेवढी हाडे मिळाली आहेत, त्यामध्ये चेहऱ्याचा सुमारे 13 हाडे आणि जबड्याचा भाग दिल्ली पोलिसांनी जप्त केला आहे आणि ते सीएफएसएलकडे तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. एफएसएलमध्ये नार्को, पॉलीग्राफी चाचणी घेतली जाईल. पोलिसांनी जप्त केलेली हाडे आणि जबड्याचे भाग, रक्ताच्या खुणा यांचा तपास सीएफएसएलकडून केला जात आहे.
नार्को टेस्टमुळे या प्रश्नांचा उलगडा होणार?
आरोपीकडून हत्येचे पुरावे मिटवल्याची माहिती मिळेल.
फ्रिजमधल्या शरीराच्या तुकड्यांचे पुरावे कसे मिटवले?
घरातील रक्ताचे डाग कसे मिटवले?
बेडवर श्रद्धाची हत्या केली तर बेडवरची चादर कुठे गेली?
बेडवर हत्या केली तर बेडवरील रक्ताचे डाग कसे मिटवले?
शरीराचे तुकडे करण्यासाठी सुरा कोणत्या दुकानातून आणला?
कबुली जबाब किती खरा आहे हे तपासता येईल.
आतापर्यंत हे पुरावे सापडले,
श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांना आतापर्यंत श्रद्धाच्या मृतदेहाचं काही अवशेष आणि हाडे सापडली आहेत. ज्या रेफ्रिजरेटरमध्ये श्रद्धाच्या शरीराचे तुकडे ठेवण्यात आले होते ते ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच श्रद्धा आणि आफताबचे काही कपडेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पण पोलिसांना आतापर्यंत श्रद्धाचे शीर, खुनाचे शस्त्र, रक्ताने माखलेले कपडे सापडले नाहीत. या संबंधी कोणताही प्रत्यक्षदर्शी अद्याप समोर आला नाही. तसेच घटनेचे कोणताही व्हिडीओ फुटेज समोर आलेला नाही.
पॉलिग्राफीनंतर नार्को चाचणी होणार
एखाद्या हायप्रोफाईल गुन्ह्याच्या तपासात पुराव्याच्या शोधासाठी आरोपीची नार्को चाचणी केली जाते. या चाचणीदरम्यान आरोपीला एक इंजेक्शन देण्यात येतं. यानंतर आरोपी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पोहोचता. त्यानंतर त्याच्याकडून अपेक्षित उत्तरं मिळू शकतात.