मुंबई : कोरोनाच्या  महामारीच्या रूपानं अनेक दशकातील सर्वात मोठं संकट जगासमोर आलं आणि अवघं जग ठप्प झालं. डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि नंतर त्याचा जगभरात प्रसार झाला. जगभरातील एकेक देशांमध्ये लॉकडाऊन लागायला सुरुवात झाली. भारतातही लॉकडाऊनच्या आधीची पायरी म्हणजे जनता कर्फ्युला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन वर्षात भारतामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या, देशातल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्याचाच घेतलेला वरवचरचा हा आढावा,


आरोग्य व्यवस्थेची तक्तरं वेशीवर
कोरोना काळात सर्वाधिक अपयश कुणाचं समोर आलं असेल तर ते देशातील आरोग्य व्यवस्थेचं असंच उत्तर आहे. या काळात देशातील आरोग्य व्यवस्थेची तक्तरं वेशीवर टांगली गेली. देशातील आरोग्य व्यवस्था सर्वसामान्य नागरिकांना योग्य प्रकारे सेवा देऊ शकत नाही हे अधोरेखित झालं. अनेक नागरिकांना कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये उपचाराविना आपला जीव गमवावा लागला. त्यातल्या त्यात याचा सर्वाधिक फटका हा दारिद्र्य रेषेखालील लोकांना बसला. या काळात एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे कोरोनाच्या उपचारासाठी लागणारा लाखो रुपयांचा उपचार या कात्रीत सामान्य लोक अडकले. पैशाच्या अभावी अनेकांना उपचार मिळाले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला. 


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही हीच परिस्थिती कायम राहिली. दुसऱ्या लाटेच्या वेळी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना रुग्णालयामध्ये, रुग्णालयाच्या बाहेर जीव सोडावा लागला. याचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि केरळला बसला. महाराष्ट्रासारख्या प्रगत समजल्या जाणाऱ्या राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा ठासून समोर आल्या. तीच अवस्था केरळची. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये केरळला मोठा फटका बसला. उत्तर प्रदेशमध्ये तर गंगा किनारी मृतदेहांचा खच दिसत होता. प्रेतांच्या विल्हेवाटासाठी स्मशानभूमीही अपूरी पडू लागल्यावर ती सरळ गंगा नदीत सोडण्यास सुरुवात झाली. 


मजुरांचं हाल आणि हजारो किमीची पायपीट
कोरोनाच्या पहिल्या लाटेत, लॉकडाऊन लागल्यानंतर सर्वाधिक फटका जर कुणाला बसला असेल तर तो स्थलांतरीत मजुरांना. उत्तर भारतातील मजूर हे मुंबईसह महाराष्ट्रभर पसरले आहेत. त्यानंतर गुजरात, दिल्लीसारख्या राज्यांमध्येही त्यांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊन लावताना कोणतेही नियोजन नाही किंवा कोरोनाचा हा प्रादुर्भाव खूप काळ राहणार नाही या समजामुळे असेल, अचानकपणे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मुंबईतील लाखो मजुरांची उपासमार सुरू झाली. त्यांना धड काही खायला मिळेना आणि धड गावाकडे जायला गाड्या मिळेनात. या काळात रेल्वे आणि वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आल्याने या मजुरांची चांगलीच गोची झाली. आपण जिथे राहतोय तिथले भाडे परवडेना, कुटुंबांना भाजी-पाला दूरच पण अगदी दूधही मिळेना अशी अवस्था झाली. 


त्यामुळेच शेवटी या मजुरांनी हजारो किमीची पायपीट करण्याची तयारी करत आपापल्या गावाचा रस्ता धरला. मुंबई ते उत्तर प्रदेश-बिहार असा पायी प्रवास करण्याचं धाडस किंबहुना नाईलाज झाला त्यावरुनच परिस्थिती किती गंभीर झाली हे समोर आलं. 


शेतकऱ्यांना फटका
कोरोना काळात सर्वच सेवा ठप्प झाल्याने, कडक लॉकडाऊन लागल्याने शेतात पिकवलेल्या उत्पादनाचं काय करायचं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. त्यातल्या त्यात काहीतरी वेगळा प्रयोग करणाऱ्या होतकरु शेतकऱ्यांचं या काळात अतोनात नुकसान झालं. फळं-भाज्या थेट रस्त्यांवर टाकाव्या लागल्या. वाहतुकीच्या अभावी ते बाजारामध्ये पोहचत नव्हतं, त्यामुळे जागेवरच कुजून गेलं. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे यामुळे मोठा पेच उभा राहिला. शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं. 


नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले
लॉकडाऊन लागल्यानंतर काहीच दिवसांमध्ये याचे तोटे समोर येऊ लागले. यामध्ये अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. उत्पादनाला मागणीच नसल्याने त्याचा नकारात्मक परिणाम झाला. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकून कर्मचारी संख्या कमी केली. तसेच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी घट केली. परिणामी देशातील बेरोजगारांची संख्या वाढली. 


छोटे-मोठे व्यवसाय बंद
लॉकडाऊन लागल्यानंतर सर्वात मोठा परिणाम झाला तो देशातील व्यवसायांवर. देशातील अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद झाले. छोट्या उद्योगांचा कणाच या काळात मोडला. दोनवेळा लागलेल्या लॉकडाऊननंतर आजही हे क्षेत्र तितक्या क्षमतेनं उभारु शकलं नाही. 


जवळचे नातेवाईक गमावले, माणुसकी संपली
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात अनेकांना आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमवावं लागलं. या काळात अवघा देशच कोरोनाच्या भीतीमुळे घरात बंद झाला. त्यामुळे रक्तातल्या नात्यामध्येही दुरावा निर्माण झाला. कोरोनाची दहशतच इतकी होती की त्यामुळे शेजारी हा शेजाऱ्याच्या मदतीला जायला धजत नव्हता. नातेवाईकांनी आपल्या घरी येऊ नये असंच सर्वांना वाटत होतं. त्यातूनही जर कोणी आला तर त्याला त्या घरात पाणीही प्यायला मिळेल का याची शंका होती. 


अगदी कुणाचा मृत्यू जरी झाला तरी त्याच्या प्रेतासाठी चार खांदेकरी मिळायचं अवघड झालं होतं. या काळात अनेकांनी आपल्या घरच्यांच्या मृत्यूनंतर हातगाडीवरुन, अंगावरुन किंवा मिळेल त्या साधनांनी प्रेतांचं वहन केलं. त्यांच्या मदतीला कोणीच यायचं नाही. 


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हे प्रमाण जरा कमी झालं. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाच्या लक्षणांबद्दल आणि उपचाराबद्दल जागरुकता निर्माण झाल्यानंतर लोकांमध्ये थोडी माणुसकी परत आली असं म्हणायला हरकत नाही. कारण या काळात लोक एकमेकांच्या मदतीला जायचे. 


अर्थव्यवस्थेमध्ये मंदी, महागाई वाढली
लॉकडाऊन लागल्यानंतर याचा मोठा परिणाम झाला तो अर्थव्यवस्थेवर. या काळात देशाची जीडीपी हा नकारात्मक गेला, देशाची अर्थव्यवस्था पार कोलमडली. कृषी, व्यापार आणि सेवा ही तीनही क्षेत्रं ठप्प झाली. दुसरा परिणाम असा झाला की देशामध्ये महागाई चांगलीच वाढली. त्यामुळे लॉकडाऊनमुळे आधीच कंबरडं मोडलेल्या सर्वसामान्यांना महागाईला सामोरं जावं लागलं. 


स्वच्छतेप्रति जागरुकता, आरोग्याची काळजी
कोरोना काळात त्यातल्या त्यात जर काही सकारात्मक झालं असेल तर ते लोकांमध्ये स्वच्छतेप्रति जागरुकता वाढली. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून लोक सॅनिटायझरचा वापर करु लागले, बाहेरुन आल्यानंतर काळजी घेऊ लागले, एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेऊ लागले, बाहेर वावरताना मास्कचा वापर करु लागले. तसेच कोरोनावर मात करायची असेल तर आपली शारीरिक क्षमता चांगली हवी हे लोकांना उमजून  चुकलं. त्यामुळे या काळात लोकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. व्यायाम, योगा, फिरणे यावर लोकांचा भर होता. तसेच उत्तम आरोग्यासाठी जे काही लागते त्याचा अन्नामध्ये समावेश होऊ लागला. 


प्रदूषण कमी
कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यानंतर प्रदूषणामध्ये मोठी घट झाल्याचं दिसून आलं. त्यामध्ये नद्या अगदी निर्मल दिसू लागल्या. दिल्ली, मुंबईसारख्या शहरांतील प्रदुषणाच्या पातळीमध्ये लक्षणीय घट झाली. 


ऑनलाईन व्यवहार वाढले
कोरोना काळात कॅशचा वापर कमी झाला आणि ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना ऑनलाईन व्यवहारावर भर द्यावा यासाठी आवाहन केलं. अनेक ठिकाणी कॅशलेस व्यवहार सुरू झाले, ते आजतायागत सुरू आहेत. पण या ऑनलाईन व्यवहारांसोबतच सायबर क्राईमच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली. अनेकाची लाखो रुपयांची फसवणूक होऊ लागली. 


ओटीटीला चांगले दिवस
या काळात सर्वजण घरीच असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सुगीचे दिवस आले. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम तसेच इतर ओटीटीवर तरुणाईच्या उड्या पडल्या. परिणामी आता चित्रपटसृष्टीमध्ये मोठा बदल झाल्याचं दिसून येतंय. अनेक चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. या काळात वेब सीरिजच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली. 


वर्क फ्रॉम होम सुरू
जगभरातील कंपन्यांनी आपले व्यवहार सुरू रहावेत यासाठी वर्क फ्रॉम होम सुरू केलं. कर्मचाऱ्यांना घरीच बसून काम करण्याची मुभा मिळू लागली. आज कोरोना आटोक्यात आला असतानाही अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरूच ठेवलं आहे. त्याचे काही फायदे आणि तोटेही आहेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha