Covid-19 New Variant : देशात ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या आकडेवारीत भर पडत आहे. देशात हा नवा व्हेरियंट वेगानं आपले हातपाय पसरताना दिसत आहे. देशात सातत्यानं वाढणाऱ्या ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येनं धाकधुक वाढवली आहे. देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बैठक बोलावली आहे. सायंकाळी 6.30 वाजता ही बैठक पार पडणार आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. बुस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात निर्णय प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत मोदी काय निर्णय घेणार? पुन्हा निर्बंध लादणार का? याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जिनोम सिक्वेंसिंगमार्फत आतापर्यंत देशात ओमायक्रॉनच्या 214 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीत सर्वाधिक 57 ओमायक्रॉनबाधित आहेत. तर महाराष्ट्रात 54, तेलंगणात 24, कर्नाटकात 19, राजस्थानमध्ये 18, केरळात 15 आणि गुजरातमध्ये 14 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात 15 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे सर्व राज्यांना पत्र
आरोग्य विभागाकडून सर्व राज्यांचा इशाराही देण्यात आला आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट तीन पटींनी अधिक वेगानं पसरतो. त्यामुळे आता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. परंतु, अनेक ठिकाणी नागरिक निष्काळजीपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळेच केंद्रानं राज्यांना तिसरी लाट रोखण्यासाठी पत्र लिहिलं आहे.
संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना कोविड-19 आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं पत्र लिहिलं आहे. सर्व जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ओमायक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा तीन पट वेगाने पसरत असल्याचा वैज्ञानिकांचा अभ्यास आहे. या पत्राद्वारे राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. कन्टेन्मेंट झोन, टेस्टिंग आणि सर्वेलन्स, क्लिनिकल मॅनेजमेंट, लसीकरण आणि कोरोनासंदर्भातील नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात केंद्राने राज्यांना नाईट कर्फ्यू, मोकळ्या जागेतील सभा तसेच लग्नसमारंभ, अंत्य यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासही सांगितलं आहे.
राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही
कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (बुधवारी) 1201 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 953 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 99 हजार 760 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. राज्यात काल ओमायक्रॉनच्या एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 65 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 35 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
काल राज्यात 1201 नव्या कोरोनाबाधितांची भर
राज्यात काल 1201 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 953 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 99 हजार 760 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. राज्यात काल आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7 हजार 350 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 75 हजार 273 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 860 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 80 , 06, 322 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ओमायक्रॉनचं संकट! राजधानी दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी
- कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनंतर ओमायक्रॉनला कशी मात द्याल?, अदर पुनावालांनी भन्नाट पोस्ट करत दिली माहिती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह