Covid Sub-Variant JN.1 Cases in India : देशात एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे (Corona New Variant JN.1) चिंता वाढली आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे, यामधील बहुतेक रुग्णांना JN.1 व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर येत आहे. सध्या देशात सर्वत्र थर्टी फर्स्ट आणि न्यू एयर सेलिब्रिशेनचं वातावरण असताना गर्दी होण्याची आणि त्यातून कोरोनाचा प्रसार आणखी वेगाने होण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.


JN.1 व्हेरियंटचा वाढता संसर्ग


देशात कोरोनाच्या JN.1 व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. एका दिवसात नवीन JN.1 व्हेरियंटचे 100 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 529 रुग्णांची वाढ झाली आहे. तर कोरोना व्हायरसच्या नव्या JN.1 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. राजधानी दिल्ली कोरोनाच्या JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.


दिल्लीत JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडला


देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरियंटच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे, देशातील एकूण रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. बुधवारी देशात एकूण 529 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, देशात सध्या कोरोनाचे 4,093 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


JN.1 व्हेरियंटचे सर्वात जास्त रुग्ण 'या' राज्यात


देशात अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या JN.1 व्हेरियंटने डोकेदुखी वाढवली आहे. केरळ, कर्नाटक, गुजरातसह दिल्लीमध्ये नव्या JN.1 व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. देशात नवीन JN.1 प्रकाराचे सर्वाधिक रुग्ण गुजरातमध्ये आहेत. 8 डिसेंबरला केरळमध्ये JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला होता, त्यानंतर आता हा विषाणू अनेक राज्यांमध्ये पसरला आहे.


9 राज्यांमध्ये JN.1 सब-व्हेरियंटचा शिरकाव


कोरोनाचा नवीन सब-व्हेरियंट JN.1 आता नऊ राज्यांमध्ये पसरला आहे. बुधवारी दिल्लीतील एकाला JN.1 व्हेरियंटची लागण झाल्याची नोंद झाली आहे. त्यासोबत, JN.1 व्हेरियंटचे गुजरातमध्ये 36, कर्नाटकात 34, गोव्यात 14, महाराष्ट्रात 9, केरळमध्ये 6, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 4-4 आणि तेलंगणामध्ये 2 रुग्ण सापडले आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक कोरोना रुग्ण सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. बुधवारी महाराष्ट्रात नवीन कोविड रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून बुधवारी 87 रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा मंगळवारपेक्षा जास्त आहे. मंगळवारी 37 नवीन प्रकरणं नोंदवली गेली होती.


कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ


5 सप्टेंबरपर्यंत प्रकरणांमध्ये घट नोंदवली गेली. मात्र थंडीचे आगमन होत असल्याने रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोविड-19 चे नवीन प्रकार समोर आल्याने आरोग्य विभागाची चिंताही वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली असली तरी, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे कारण बहुतेक प्रकरणांमध्ये लक्षणे सौम्य आहेत. INSACOG हे जीनोमिक प्रयोगशाळांचे नेटवर्क आहे, येथे जीनोमिक सीक्वेंन्सिंगद्वारे कोरोना विषाणूचं निरीक्षण केले जात आहे.