Copper Face Mask : मागील दोन वर्षांपासून देशभरात कोरोना महामारीने हाहा:कार माजवला आहे. कोरोना महामारीस कारणीभूत ठरलेल्या सार्स कोविड विषाणूपासून बचाव करण्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे अत्यंत प्रभावी ठरले आहे. हा आरएनए विषाणू श्वसनाच्या मार्गाने पसरतो. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी मास्क पहिल्यापासूनच सर्वात मोठं शस्त्र साध्य झाले आहे. पण कोणत्या पद्धतीचं मास्क वापरायचा हा प्रश्न कायमच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारतीय वैज्ञानिंकांनी एक अँटीव्हायरल मास्क तयार केला आहे. शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याची माहिती देण्यात आली. या मास्कच्या माध्यमातून विषाणूचा प्रसार रोखण्यात यश येत आहे, त्यामुळे वैज्ञानिक हे मास्क अधिकाधिक प्रभावी करण्यासाठी संशोधन करत आहेत. 


कोरोनाविरोधातील लढण्यासाठी भारताच्या वैज्ञानिकांनी उद्योग जगताच्या सहकार्याने स्वयं-निर्जंतुक करणारा अँटीव्हायरल मास्क तयार केला आहे. शुक्रवारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. मास्क तयार करताना तांब्याच्या तंतू कणांचा (copper based nanoparticles) वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा मास्क कोरोनासह इतर संसर्गजन्य आणि जिवाणू संक्रमणापासून (Bacterial Infections) बचाव करतोय. मंत्रालयाने सांगितले की, हे मास्क कोरोना विषाणूपासून बचाव करण्यात प्रभावी आहे. त्याशिवाय इतर अनेक विषाणू आणि जीवाणूंच्या संसर्गापासून संरक्षण करण्यात देखील उपयुक्त ठरत आहेत. तसेच संपूर्णपणे विघटित होणाऱ्या घटकांपासून तयार करण्यात आलेले आहे. हे मास्क घालून श्वासोच्छ्वास घेणे सोपे आहे, तसेच ते धुता देखील येते.    






विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील स्वायत्त संशोधन संस्थेने पेशीविज्ञान आणि आण्विक जीवशास्त्र संशोधन केंद्र, सीएसआरआर-सीसीएमबी आणि रेसिल केमिकल्स या बंगळुरू येथील कंपनीच्या सहकार्याने, 'स्वयं-निर्जंतुक होणारे, नॅनो पार्टीकल्सचे आवरण असलेल्या विषाणूरोधी फेस मास्क' विकसित केले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग पुरस्कृत कोविड महामारी विरुद्धच्या लढ्यासाठीच्या नॅनो-मिशन प्रकल्पाअंतर्गत, हे संशोधन करण्यात आले आहे.


ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट इतर व्हेरियंटच्या तुलनेत अधिक वेगाने पसरतो. हवेमार्फत हा व्हेरियंटचा अतिशय वेगाने संसर्ग होतो. अशा कालावधीत चांगल्या दर्जेचा मास्क आपलं विषाणूपासून संरक्षण करतो. त्यामुळे भारत सरकारने तयार करण्यात आलेला मास्क प्रभावी ठरु शकतो.