नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे आरोग्य किती महत्वाचं आहे, याची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. कोरोना विषाणूच्या भीषण लाटेपासून आपलं रक्षण करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवणं आवश्यक आहे. साथीच्या काळात सकस आहार घेणे महत्वाचे आहे. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कोणत्या प्रकारचे अन्न आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने आपल्या mygovindia ट्विटर हँडलवर काही खाद्यपदार्थांची यादी केली आहे, जे कोविड 19 संकटाच्या दरम्यान आपली नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करेल.


कोविड 19 मधून सावरलेल्या लोकांनी स्नायू, रोग प्रतिकारशक्ती आणि उर्जेची पातळी पुन्हा मिळवण्यावर भर दिला पाहिजे. केंद्र सरकारने महामारीकाळात नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खाद्यपदार्थांची यादी जाहीर केली.




कोरोना रूग्णांसाठी शासकीय आहार
कोरोना रूग्णांसाठी केंद्र सरकारने डार्क चॉकलेट, हळद असलेले दूध, प्रथिनेयुक्त पदार्थांची शिफारस केली आहे. mygovindia च्या ट्विटर हँडलवर सरकारने बेसिक डाएट प्लॅन सुचविला आहे. याचे पालन केल्यास प्रतिकारशक्ती सुधारण्यास आणि स्नायूंची शक्ती आणि ऊर्जा वाचविण्यात मदत होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.


कोरोना कालावधीत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय खावे?



  • कोविड रुग्णांचे मुख्य लक्ष स्नायू, रोग प्रतिकारशक्ती आणि उर्जेची पातळी वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांवर असली पाहिजे.

  • नाचणी, ओट्स आणि अमरनाथ सारख्या संपूर्ण धान्यांचा वापर आहारात करण्याचा सल्ला दिला आहे.

  • कोंबडीचे मांस, मासे, अंडी, सोया, नट, चीज यासारख्या प्रथिनांचा चांगला स्त्रोत असलेले खाद्यपदार्थ खाण्यास सांगितले आहे.

  • बदाम, अक्रोड, ऑलिव्ह ऑईल, मोहरी तेल यासारख्या गोष्टींचा वापर करण्यास सांगितलंय.

  • नियमित शारीरिक हालचाल जसे की योग आणि श्वास व्यायाम (प्राणायाम) करणे आवश्यक आहे.

  • चिंतेपासून मुक्त होण्यासाठी कमी प्रमाणात डार्क चॉकलेट खा, ज्यामध्ये कमीतकमी 70 टक्के कोको असेल.

  • रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हळदीचे दूध दिवसातून एकदा प्या.

  • मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना रुग्णांमधील बहुतेक रूग्णांची चव, गंध येत नाही किंवा गिळणे अवघड होते.

  • अशा परिस्थिती थोड्या थोड्या वेळाने मऊ खाणे महत्वाचे आहे. आहारामध्ये आंबा पावडरचा समावेश करणे देखील योग्य आहे.