गुवाहाटी : भाजप नेते हेमंत बिस्वा सरमा आता आसामचे नवे मुख्यमंत्री असतील. आज झालेल्या विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. हेमंत बिस्वा सरमा हे संध्याकाळी चार वाजता राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेतील आणि सत्ता स्थापनेचा दावा करतील. त्यानंतर हेमंत बिस्वा सरमा उद्या आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
आज गुवाहाटी येथे एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे महासचिव अरुण सिंह हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं की, नवनिर्वाचित सदस्यांनी हेमंत बिस्वा सरमा यांची सर्व संमतीने नेतेपदी निवड करण्यात आली आहे. ही बैठक सुरु होण्यापूर्वी सर्वानंद सोनोवाल यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
आसामचे सध्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनावल आणि हेमंत बिस्वा सरमा यांना काल दिल्लीमध्ये बोलवलं होतं. यावेळी या दोन नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर हेमंत बिस्वा सरमा हेच आसामचे नवे मुख्यमंत्री असतील याची फक्त औपचारिकता राहिली होती.
आसाममध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपने आपली सत्ता राखली आहे. भाजपने 126 विधानसभा जागांपैकी 60 जागांवर विजय मिळवला असून भाजपचे सहयोगी पक्ष आसाम गण परिषदने नऊ तर पिपल्स पार्टी लिबरलने सहा जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या आधी भाजपने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता.
हेमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेसच्या रोमेन चंद्र बोरठाकुर यांचा 1,01,911 मतांनी पराभव केला आणि जालुकबारी या मतदारसंघात विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या :