मुंबई : देशात सध्या कोरोनाचं लसीकरण सुरु आहे. यात सीरम इन्स्टिट्यूच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या दोन लसी दिल्या जात आहेत. केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या एका तज्ञांच्या पॅनलनं भारत बायोटेकच्या Covaxin लसीला 'क्लिनिकल ट्रायल मोड' वरुन हटवण्याची मागणी केली आहे. पॅनलनं म्हटलं आहे की, या वॅक्सिनच्या आपत्कालीन उपयोगाची परवानगी दिली जावी. तज्ञांच्या या शिफारशीला भारताच्या औषध महानियंत्रक (DCGI) कार्यालयाकडे पाठवण्यात आलं आहे.
समितीकडून वॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील आकड्यांच्या समीक्षेनंतर शिफारस
सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी (एसईसी) कडून करण्यात आलेल्या या शिफारशीला जर DCGI कडून स्वीकार केलं गेलं तर ही लस आपत्कालीन स्थितीत वापरात येऊ शकेल. त्यानंतर लाभार्थ्यांना वॅक्सिन घेण्यासाठी हस्ताक्षर करण्याची गरज राहणार नाही. या समितीनं कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील आकड्यांवर रिसर्च केला होता. ज्यात लसीचा प्रभाव 80.6 टक्के मिळाला होता. त्यानंतर ही शिफारस करण्यात आली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार भारत बायोटेककडून करण्यात आलेल्या मागणीनुसार एसईसीनं शिफारस करत "कोविशिल्ड" प्रमाणे मंजूरी देण्यात यावी असं म्हटलं आहे.
Covaxin | भारत बायोटेकची लस 81 टक्के प्रभावी, तिसऱ्या फेजच्या अहवालातून स्पष्ट
आता DCGI च्या निर्णयाकडे लक्ष
आता या प्रक्रियेत ड्रग्स कंट्रोलर जनरल (डीसीजीआय), डॉ. वी जी सोमानी यांचा निर्णय महत्वाचा राहणार आहे. ते आता एसईसीच्या शिफारशीवर विचार करुन कोवॅक्सिनच्या आपत्कालीन उपयोगाच्या परवानगीबाबत निर्णय घेणार आहेत. भारतात अद्याप कोविड 19 वर कुठल्याही लसीला कमर्शियल विक्रीची परवानगी दिलेली नाही. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींना केवळ लसीकरण कार्यक्रमात वापरासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.
कोव्हॅक्सिन 81 टक्के प्रभावी
भारत बायोटेकची कोरोनाची लस कोव्हॅक्सिन ही 81 टक्के प्रभावी असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. भारत बायोटेकने आपल्या कोरोनाच्या लसीच्या तिसऱ्या फेजचा अहवाल उघड केला आहे. कोरोनावर ही लस आता 81 टक्के प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं आहे असा दावा भारत बायोटेकने केला आहे. कोरोना लसीच्या तिसऱ्या फेजच्या अभ्यासासाठी एकूण 25,800 लोकांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. त्यावेळी ही लस घेतलेल्या लोकांमध्ये कोणताही दुष्परिणाम दिसून आला नसल्याचंही कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्डची लस ही 62 टक्के, फायझर-बायोएनटेकची लस 95 टक्के आणि मॉडर्नाची लस ही 94 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येतंय. जॉन्सन अॅन्ड जॉन्सन या कंपनीने त्यांची लस ही 66 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं होतं.
कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेक, आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांच्यावतीने संयुक्तपणे विकसित केली जात आहे. याच्या आपत्कालीन वापरासाठी या आधीच परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेकच्या Covaxin या कोरोना लसीच्या पहिल्या फेजचा पुनरावलोकन डेटा 'द लॅन्सेट' या सायन्स नियतकालिकेत प्रसिध्द करण्यात आला होता. अशा प्रकारचा डेटा प्रकाशित करणारी भारत बायोटेक ही भारतातील पहिलीच कोरोना लस निर्मिती करणारी कंपनी आहे. ICMR नेही या गोष्टीला पुष्टी दिली आहे.
भारत बायोटेकच्या पहिल्या फेजमध्ये 375 लोकांवर या लसीचा वापर करण्यात आला होता. त्यासंबंधीचा डेटा लॅन्सेटकडे जमा करण्यात आला होता. आता तो पहिल्या फेजचा डेटा लॅन्सेट या नियतकालिकेत प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की Covaxin लसीमुळे मानवी शरीरातील अॅन्टीबॉडी या क्रियाशील होतात, तसेच शरीरामधील T-cell याही क्रियाशील होतात. अॅन्टीबॉडी हे एक प्रकारचे प्रोटिन्स असतात जे मानवी शरीरातील व्हायरसविरोधात तयार होतात आणि त्या विरोधात लढतात. T-cell या कोणत्याही रोगाविरोधात लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीची निर्मिती करण्यासाठी अत्यावश्यक असतात.