लडाख : देशात उद्या 22 वा कारगिल विजय दिवस साजरा होणार आहे. यानिमित्ताने देशाचे राष्ट्रपती आणि सशस्त्र सैन्याचे सर्वोच्च कमांडर रामनाथ कोविंद उद्या द्रासमधील कारगिल वॉर मेमोरियल येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतील. उद्या सकाळी आठ वाजता कारगिल वॉर मेमोरियरपासून कार्यक्रमास प्रारंभ होईल. दरम्यान लडाखमध्ये काल कारगिल विजय दिवसाच्या 22 व्या वर्धापन दिनापूर्वी द्रास येथील कारगिल वॉर मेमोरियल येथे बीटिंग रिट्रीट समारंभ आयोजित करण्यात आला होता.


उद्या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत आणि लष्कराच्या उत्तरी विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी आणि लेह येथील 14 व्या कोरचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन उपस्थित असतील. सकाळी आठ वाजता हा उपक्रम सुरू होईल. यानंतर 1971 च्या युद्धाची विजयी मशालही द्रास वॉर मेमोरियल येथे पोहोचेल. उपस्थित मान्यवर आणि लष्करी कमांडर यांचेकडून मशालीचे स्वागत केले जाईल.


जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या चार दिवसांच्या दौर्‍याचा भाग म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी येथे दाखल झाले. राष्ट्रपती सकाळी 11.15 वाजता श्रीनगर विमानतळावर पोहोचले. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि पोलिस व केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की 25 जुलै ते 28 जुलै दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती सोमवारी लडाखमधील द्रास शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतील. याआधी 2019 च्या सुरुवातीला खराब हवामानामुळे कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमाता राष्ट्रपती सहभागी होऊ शकले नव्हते.  


विजय दिन का साजरा केला जातो?


1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ज्यात भारताने विजय मिळवला होता. त्या युद्धाच्या विजयाच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवस दरवर्षी कारगिलच्या द्रास येथील युद्ध स्मारकात साजरा केला जातो. 1999 मध्ये पाकिस्तानी सैन्याने भारताच्या या शिखरांवर घुसखोरी केली होती. 14 ते 18 हजार फूट उंचीवर असलेल्या या शिखरावरून भारतीय सैन्याने मोठ्या शौर्याने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं होतं. या युद्धामध्ये आपले 500 सैनिक शहीद झाले होते. हे युद्ध लष्करी इतिहासामध्ये एक अतिशय कठीण आणि धोकादायक युद्ध म्हणून ओळखले जाते.