Himachal Pradesh Landslide: हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये मोठा अपघात झाला आहे. सांगला खोऱ्यात दरड पुलावर कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. किन्नौर जिल्हा एसपी साजू राम राणा यांनी सांगितले की, नऊ जणांचा मृत्यू झाला असून तीन जखमी झाले आहेत. या घटनेत बटसेरी पूल कोसळला असून बचाव दल घटनास्थळी हजर असल्याचे एसपीने सांगितले.
सांगला येथे जाणाऱ्या पर्यटकांचे वाहन भूस्खलनाच्या कचाट्यात सापडले. हे पर्यटक छत्तीसगडचे असल्याचे सांगितले जात आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. डोंगरावरुन मोठे दगड घसरत पुलावर आदळले. तिथं सुरू असलेल्या बांधकामांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचीही माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी त्यांच्या मोबाइल कॅमेऱ्यात याचे भयानक दृश्य कैद केलंय.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी ट्वीट केले की, “किन्नौरमधील बटसेरी येथे दरड कोसळल्याने झालेला अपघात हृदयाचा थरकाप उडवणारा आहे. या अपघातात पर्यटकांची गाडी वाहून गेल्याची बातमी आहे, ज्यात 9 जणांचा मृत्यू आणि 2 जण जखमी झालेत. देव दिवंगत झालेल्या आत्म्यास शांती व शोकाकुल कुटुंबाला यातून बाहेर येण्यासाठी शक्त देवो. मी किन्नौर जिल्हा प्रशासनाशी बोललो व अपघाताची माहिती घेतली असून त्यांना योग्य मार्गदर्शन केलंय. प्रशासनाने घटनास्थळी मदतकार्य सुरू केले असून बाधित नागरिकांना तातडीने मदत दिली जात आहे. जखमी लवकरात लवकर रिकव्हर व्हावे, अशी मी देवाला प्रार्थना करतो.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरावरुन मोठे दगड घसरत वेगाने खाली असलेल्या पुलावर आदळले. तिथं सुरू असलेल्या बांधकामांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचीही माहिती आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास डोंगरावरून मोठे दगड खाली येऊ लागले. दगड खाली येत असताना बॉम्बचा स्फोट झाल्यासारखा आवाज आला.