COVID-19 Vaccine Booster Shots : भारतात 10 जानेवारीपासून कोरोना लसीकरण पूर्ण केलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. संबंधित व्यक्तींनी जी लस घेतली आहे, तीच लस बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याशिवाय इतर लशीचा डोस द्यायचा का, याबाबत चर्चा सुरू आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्यूनायझेशनमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आयसीएमआरचे संचालक प्रा. बलराम भार्गव यांनी सांगितले. याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आसीएमआरचे संचालक प्रा. भार्गव यांनी सांगितले की, बुस्टर डोसबाबत आमची बैठक सुरू आहे. सध्या बुस्टर डोसची आवश्यकता किती लोकांना आहे, यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, 60 वर्षावरील नागरिकांची संख्या आदी बाबत माहिती घेणे सुरू आहे. त्याशिवाय, कोणती नवीन लस उपलब्ध आहे. कोणती लस दिली जाऊ शकते, यासाठी उपलब्ध असलेल्या माहितीचे विश्लेषण करत आहोत. 10 जानेवारीच्या आधीच बुस्टर डोस बाबत शिफारस करण्यात येणार आहे. त्यानंतर ड्रग्ज कंट्रोलर, एनटीएजीआयकडून निर्णय घेतला जाईल.
बुस्टर डोसबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. लसीकरण झालेल्या व्यक्तींना इतर लस देण्याचा विचार सुरू आहे. ज्या लोकांनी कोवॅक्सिन लस घेतली, त्यांना कोविशिल्ड अथवा इतर लस देण्याचा विचार होऊ शकतो. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवेगळी माहिती, डेटाचे विश्लेषण केले जात आहे.
भारतात 10 जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वेही प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार,
- Comorbidity असल्याचे दाखवण्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र, प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुस्टर डोस घेण्यात यावा
- ज्यांनी दुसरा डोस घेऊन 9 महिने (39 आठवडे) झाले असतील अशांना हा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.
-CoWIN द्वारे बुस्टरसाठी पात्र असणाऱ्यांना एसएमएस द्वारे स्मरण संदेश पाठवण्यात येईल. डिजीटल प्रमाणपत्रात बुस्टर डोसची माहिती दिसून येईल.