Coronavirus Nasal vaccine : कोरोना महासाथीच्या आजाराची तिसरी लाट भारतात धडकली असताना बुस्टर डोस देण्यात येत आहे. त्याशिवाय इतरही नवीन लशींची चाचणी सुरू आहे. यामध्ये नाकावाटे घेण्यात येणाऱ्या नेझल वॅक्सिनचाही समावेश आहे. भारत बायोटेकला बुस्टर डोसच्या स्वरुपात इंट्रानेझल कोविड-19 लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सरकारने मंजुरी दिली आहे.
नाकावाटे देण्यात येणाऱ्या लशीबाबत दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञा संस्थानमधील (एम्स) वरिष्ठ महासाथ आजार तज्ज्ञ डॉ. संजय राय यांनी म्हटले की, लस चाचणीच्या दरम्यान जर या लशीने म्युकोसल इम्युनिटी निर्मिती केल्यास कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस गेम चेंजर ठरू शकते.
डॉ. संजय राय यांनी सांगितले की, जर ही लस म्यूकोसल रोगप्रतिकारक शक्ती देत असल्यास मानवासाठी ही मोठी गोष्ट ठरणार आहे. जगात सध्या 33 लशी आहेत. मात्र, संसर्ग रोखण्यासाठी कोणतीही लस प्रभावी ठरत नाही. ही लस म्यूकोसल रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करेल, जेणेकरून संसर्ग रोखता येईल अशी अपेक्षा डॉ. संजय राय यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सर्व स्तरांवर मजबूत करणे ही काळाची गरज आहे. कोरोना ही अखेरची महासाथ नाही. भविष्यातील साथीच्या रोगांसाठी आपण तयार असले पाहिजे आणि त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. राय यांनी केले.
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) भारत बायोटेकला इंट्रानेझल बुस्टर डोसच्या चाचणीसाठी परवानगी दिली आहे. ही चाचणी 9 वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Corona Vaccine : कोविन अॅपवर नोंदणीनंतरच मेडीकलमध्ये मिळणार कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन
- India Corona Vaccination : लसीकरणाचा आणखी एक महत्वाचा टप्पा पार, 75 टक्के प्रौढ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha