Coronavirus Updates : कोरोनाच्या संसर्गाची बाधा झालेल्या पाच दिवसाच्या नवजात बालिकेचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमधील एका रुग्णालयात बालिकेचा मृत्यू झाला. या नवजात बालिकेचा जन्म झाल्यानंतर कोरोनासह इतरही आजारांचा संसर्ग होता, अशी माहिती ग्वाल्हेरच्या प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बिंदू सिंघल यांनी दिली. ग्वाल्हेरपासून 45 किमी दूर असलेल्या डबरा आरोग्य केंद्रात या बालिकेचा जन्म झाला होता. 


डॉ. बिंदू सिंघल यांनी सांगितले की,  नवजात बालिकेचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. मात्र, या बालिकेला जन्मत: इतर आजारांचा संसर्ग झाला होता. त्यामुळे डबरा येथील आरोग्य केंद्रातून ग्वाल्हेरमधील कमलाराजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी या बालिकेचा मृत्यू झाला. बालिकेला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, तिचा मृत्यू कोरोनामुळेच झाला असावा असे म्हणता येणार नाही असेही अधिकाऱ्यांनी म्हटले. 


मध्य प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी, मध्य प्रदेशमध्ये 11 हजार 274 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.  तर, पाच बाधितांचा मृत्यू झाला.


महाराष्ट्रात मागील 24 तासांत 40 हजार 805 नवे कोरोनाबाधित


राज्यात कोरोनाबाधितांची संख्या अजूनही मोठ्या प्रमाणात आढळत आहे. रविवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात राज्यात कोरोनाच्या 40 हजार 805 नव्या रुग्णांची भर पडली. तर, 44 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात  27,377 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात रविवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही.


मुंबईत तिसरी लाट ओसरली?


रविवारी मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 24 तासात 2250 नव्या रुग्णांची वाढ झाली. तर, 13 बाधितांच्या मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय, 217 जणांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10 लाख 34 हजार 833 इतकी झाली आहे. यापैकी एकूण 9 लाख 95 हजार 786 जण कोरोनामुक्त झाले असून 16 हजार 535 बाधितांचा मृत्यू झाला आहे.