नवी दिल्ली: देशात कोरोना (corona) संकट वाढच चाललं आहे. यातच देशातील राजकारण सुद्धा तापत असल्याचं चित्र आहे. केंद्रात 'मोदी सरकार 2.0' (Modi 2.0) च्या एक वर्षपूर्तीच्या मुहुर्तावर 30 मे रोजी भाजप 1000 व्हर्चुअल कॉन्फरंससह अनेक ई-रॅलींचे आयोजन करणार आहे. तर त्याआधीच काँग्रेसनं नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. मजूर, शेतकरी आणि छोट्या दुकानदारांसाठी पॅकेजची मागणी करत काँग्रेस (Congress Online Protest) आज ऑनलाईन आंदोलन करणार आहे.
लॉकडाऊनमुळं मजूर, शेतकरी आणि गरीब लोकांचे हाल होत आहेत. या घटकांना मदत देण्याची मागणी करत कॉंग्रेस मोदी सरकारविरोधात ई आंदोलन करणार आहे. जे लोक इन्कम टॅक्सच्या परिघाच्या बाहेर आहेत अशा लोकांच्या खात्यात केंद्र सरकारकडून 10 हजार रुपयांची मदत तात्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेस आज आज 11 ते 2 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अभियान करणार आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनात फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफार्मवर एकत्रित 50 लाख कॉंग्रेस कार्यकर्ते ऑनलाईन आपली बाजू मांडणार आहेत, अशी माहिती आहे. ऑनलाईन अभियानाच्या माध्यमातून मजूर, शेतकरी आणि छोट्या दुकानदारांसाठी काँग्रेसकडून मुद्दे मांडले जाणार आहेत. आपली मागणी घेऊन कॉंग्रेस मोठ्या प्रमाणात ट्रेंड करण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसनं म्हटलं आहे की, आम्ही संकटात सापडलेल्या लोकांसाठी मागणी करत आहोत. त्यासाठी हे आंदोलन आहे. केंद्र सरकारनं या संकटात सापडलेल्या लोकांना मदत करावी आणि कॉंग्रेसनं केलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात. जे लोक इन्कम टॅक्सच्या परिघाच्या बाहेर आहेत अशा लोकांच्या खात्यात केंद्र सरकारकडून 10 हजार रुपयांची मदत तात्काळ देण्यात यावी, असं कॉंग्रेसनं पत्रकात म्हटलं आहे.
ऑनलाईन आंदोलन करत असलेल्या काँग्रेसनं लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाचा चांगलाच उपयोग केला आहे. दोन वेळा काँग्रेस वर्किंग कमिटीची आणि एकदा विरोधी पक्षांची बैठक ऑनलाईन झाली आहे. राहुल गांधी यांनी या माध्यमातून तज्ञांशी देखील बातचीत केलीय. तसंच मजूरांशी केलेला संवाद देखील या प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता. राहुल गांधी यांवी आतापर्यंत चार वेळा ऑनलाईन प्रेस कॉन्फरंस केली आहे. प्रियंका गांधी देखील ऑनलाईन अॅक्टिव्ह असतात. काही दिवसांपूर्वी योगी सरकारविरोधात यूपीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ऑनलाईन आंदोलन केलं होतं.
मोदी सरकारविरोधात काँग्रेसचं आज ऑनलाईन आंदोलन, सोनिया-राहुल गांधींसह 50 लाख कार्यकर्त्यांचा सहभाग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 May 2020 10:07 AM (IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. मजूर, शेतकरी आणि छोट्या दुकानदारांसाठी पॅकेजची मागणी करत काँग्रेस आज ऑनलाईन आंदोलन करणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -