नवी दिल्ली: चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदलाकडून या सध्याच्या परिस्थितीबाबत पर्याय मागवले आहेत. तिन्ही सैन्यदलाकडून लडाखमधील परिस्थितीबाबत पंतप्रधानांना एक अहवाल देखील देण्यात आला आहे. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालदेखील उपस्थित होते. लडाख सीमारेषेपलीकडून चीनकडून सुरु असलेल्या हालचालीमुळे भारत-चीन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आपल्या सैन्याला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताकडून देखील तयारीचा आढावा घेतला जात आहे. कालच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील बैठक घेतली होती.

पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत तिन्ही दलांकडून सध्याच्या परिस्थितीबाबत देण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये जवळ असलेले डिफेंस असेट्स आणि तणाव वाढल्याच्या स्थितीनंतर रणनीती काय असावी? याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तिन्ही दलांकडून आपापल्या तयारीबाबतच्या ब्लूप्रिंट देखील पंतप्रधानांना सोपवल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि लष्करप्रमुख  बिपिन रावत यांच्याकडून याबाबत माहिती घेतली आहे.

चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे सैन्याला तयार राहण्याचे आदेश, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची तिन्ही दलाच्या प्रमुखांशी चर्चा
लडाख सीमारेषेपलीकडून चीनकडून सुरु असलेल्या हालचालीमुळे भारत-चीन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  भारताच्या सीमेलगत चीनकडून होणाऱ्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लडाखमधील गलवा आणि पेंगोंग त्सो परिसरात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. भारताचे वरिष्ठ सैन्य अधिकारी सीमारेषेवर बारिक लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे.


गेल्या महिन्याभरात चीनने भारताच्या सीमेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. काही चीनचे सैनिक 3 ते 4 किलोमीटर आतपर्यंत आले होते. चीनचे हे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. तसेच सीमाभागातील रस्ते बांधणी व इतर कामे सुरूच ठेवली आहेत. यातील अनेक प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यामुळेच चीन बिथरला असून त्याने भारताविरोधात कुरापती सुरु केल्या आहेत. लडाखमध्ये 6-7 मे च्या दरम्यान चीन आणि भारतीय सैन्यात झटापट देखील झाली होती. यात काही सैनिक जखमी झाले होते, अशी देखील माहिती आहे.