Coronavirus Update : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid-19 Update) वाढताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशातील मंदावलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉनबाधितांच्या (Omicron) संख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे. देशभरातील  21 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड-19 चा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या 650 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीत झाली आहे.  


देशाच्या राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव 


दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत 496 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अनेक महिन्यांनी दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळालं. तसेच कोरोना संसर्गाच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये 331 रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, आता हा रेकॉर्डही मोडीत निघाला असून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या दिल्लीतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1612 वर पोहोचली आहे. 


दिल्लीत कोरोना 'आउट ऑफ कंट्रोल'


झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळं दिल्लीमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्या राजधानीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे दिल्लीमध्ये रात्री दहा वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सिनेमा हॉल, बँक्वेट हॉल, स्पा बंद करण्यात आले आहेत. रेस्टॉरंटही 50 टक्के उपस्थितीसह सुरु आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी आपल्या संबोधनात म्हटलं की, दिल्लीतील कोरोना स्थितीवर लक्ष असून बदलणारी स्थितीचा आढावा घेऊन निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्या तरी राजधानीमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. चिंतेची बाब म्हणजे, सध्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


ओमायक्रॉनच्या रुग्णांचा उद्रेक 


देशातील 21 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड-19 चा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या 650 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीत झाली आहे. देशभरात वाढणाऱ्या ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावात अनेक राज्यांनी नवे निर्बंध लागू केले आहेत. दिल्लीमध्ये आढळून आलेल्या ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 165 वर पोहोचली आहे. शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा 67 इतका होता. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत IGI विमानतळावर आलेल्या प्रवाशांची चाचणी केली होती. त्यातील 120 प्रवासी पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. या सर्व प्रवाशांचे नमुने जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवले जातील. 


मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव 


दिल्लीव्यतिरिक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1377 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाच्या दैनंदिन आकड्यातही मोठी घट पाहायला मिळत होती. दररोज 500 हून कमी रुग्णांची नोंद केली जात होती. परंतु, सध्या दैनंदिन कोरोनाबाधितांसोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी 0 मृत्यूचा दिवस पाहिलेल्या मुंबईत काल (मंगळवारी) 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या राज्यांमध्येही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


राज्यातही फोफावतोय कोरोना 


महाराष्ट्रात आज तब्बल 2 हजार 172 नव्या रुग्णांची नोंद झालीय. तर मुंबईत आज 1 हजार 377 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल मुंबईतला नव्या कोरोना रुग्णांचा आकडा 809 होता आणि आज थेट 500 हून अधिक रुग्ण नव्यानं वाढलेत. तर 338 रुग्ण कोरोनातून मुक्त झालेत. आज एका रुग्णाचा मृत्यू झालाय. मुंबईत 1 हजार 377 रुग्ण आढळल्यानं राज्याचा आकडा मोठ्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र, मुंबईवर सैल झालेला कोरोनाचा विळखा हळूहळू घट्ट होताना दिसतोय.