Coronavirus Restriction : संपूर्ण जगाची धाकधूक वाढवणाऱ्या कोरोना (Covid-19) व्हायरसचा देशात प्रादुर्भाव सध्या घटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे. 31 मार्चपासून देशातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनी देशातील जनता निर्बंधमुक्त जीवन जगणार आहे. पण, मास्क, सोशल डिस्टन्सिगचं पालन करणं मात्र अनिवार्य असणार आहे. 


सध्या देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1 हजार 778 नवीन रुग्ण आढळले असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल 1 हजार 581 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती आणि 33 जणांचा मृत्यू झाला होता. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 12 हजार 749 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात देशात 2 हजार 542 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार 87 वर आली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 16 हजार 605 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 73 हजार 57 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


कोरोनाची चौथी लाट येणार? 


गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळेच देशातील कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. पण कोरोना संपला आहे की? कोरोनाची आणखी एक लाट येणार आहे?  याबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न पडला आहे. यावर तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे. तसेच अभ्यासात अनेक खुलासे समोर आले आहेत. आयआयटी कानपूरच्या अभ्यासात जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येणार असल्याचे समोर आले आहे.  पुढील तीन महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळू शकते. पण लसीकरणामुळे रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे अथवा मृत्यूचं प्रमाण खूप कमी असेल. कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट आल्यास मात्र कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अन्यथा चौथी लाट आली तरी ती सौम्य असेल.