नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य सुविधा अपुऱ्या पडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्सिजन आणि ऑक्सिजनशी संबंधित उपकरणांच्या पुरवठ्यात वाढ करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. ऑक्सिजन आणि ऑक्सिजनशी संबंधित उपकरणांवरील सीमा शुल्क आणि आरोग्य उपकर रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
ऑक्सिजनचा पुरवठा वाढण्याबरोबरच रूग्णालय व रूग्णालयात रूग्णांच्या काळजीसाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांची तातडीने गरज आहे, यावर बैठकीत जोर देण्यात आला. येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत आयात करण्यात येणाऱ्या कोविड लसीवर असलेले मुलभूत सीमा शुल्क देखील तातडीने माफ करण्यात आले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे या वस्तूंची उपलब्धता वाढेल तसेच त्या स्वस्त दरात मिळू शकतील. या साधनांच्या आयातीला त्वरित आणि विना अडथळा सीमा शुल्क विभागाकडून मंजुरी मिळण्याची खात्री करून घेण्याचे निर्देश पंतप्रधानांनी महसूल विभागाला दिले आहेत.
ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यासाठी गेल्या काही दिवसांत कित्येक पावले उचलली गेली असल्याचे केंद्र सरकारने सांगितले. बैठकीत पंतप्रधानांनी सर्व मंत्रालये व विभागांना सूचना दिल्या की ऑक्सिजन व वैद्यकीय पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी समन्वयाने काम करण्यावर भर द्या. या व्यतिरिक्त ऑक्सिजन व उपचार साधनांचा त्वरित कस्टम क्लिअरन्स करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी बैठकीत दिले.
देशातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी हवाई दलाच्या विमानाचे सिंगापूरला उड्डाण
देशात गेल्या 24 तासात 3.47 लाख नव्या रुग्णांची भर
देशातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून काल एकाच दिवसात देशात तीन लाख 46 हजार 786 रुग्णांची भर पडली आहे. देशातील वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. गेल्या 24 तासात 2624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत वाढ झाली असून ती आता 25 लाख 52 हजार 940 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात दोन लाख 19 हजार 838 रुग्ण बरे झाले आहेत.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 66 लाख 10 हजार 451
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 38 लाख 67 हजार 997
- एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 25 लाख 52 हजार 6940
- कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 89 हजार 544
- देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 13 कोटी 83 लाख 79 हजार 832 डोस