Coronavirus Outbreak : चीनमध्ये (China) कोरोना विषाणू (Coronavirus) झपाट्याने वाढत आहेत. त्याचा परिणाम आता भारतावरही (India) होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. बुधवारी भारतातील कोविड परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandviya) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोनाच्या परिस्थितीवरील बैठकीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या


-केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय म्हणाले, "कोरोना अजून संपलेला नाही. मी सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आणि निगराणी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत." कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.


-बैठक संपल्यानंतर, NITI आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी लोकांना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला. डॉ व्ही के पॉल म्हणाले, "तुम्ही गर्दीच्या ठिकाणी, घरामध्ये किंवा घराबाहेर असाल तर मास्क अवश्य वापरा. ​​हे सर्व वृद्ध लोकांसाठी अधिक महत्त्वाचे आहे."


-या बैठकीच्या आधी एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले होते की, केंद्राच्या आढावा बैठकीत प्रामुख्याने सहा महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली जाईल. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांवरील कोविड रुग्णसंख्या रोकण्यासाठी महत्वाची धोरणे, परदेशातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे आणि कोविडच्या नवीन आवृत्तीबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे यांचा समावेश आहे. 


 



 


-मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारने म्हटले की, सर्व कोविड-पॉझिटिव्ह प्रकरणांचे नमुने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह मॅप केलेल्या INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये दररोज पाठवले जावेत. INSACOG हे आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत एक फोरम आहे, जिथे कोविडच्या विविध प्रकारांचा अभ्यास केला जातो.


-एका पत्रात आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले की, "जपान, यूएसए, कोरिया, ब्राझील आणि चीनमधील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन, या व्हेरिएंटचा मागोवा घेण्यासाठी सकारात्मक प्रकरणांच्या नमुन्यांची जीनोम सिक्वेंसिंग तयार करणे आवश्यक आहे." त्यांनी पुढे लिहिले की, "यामुळे, देशातील नवीन व्हेरिएंट वेळेवर शोधली जाऊ शकतात."


विशेष म्हणजे, गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 129 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 3,408 आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे फक्त एकाचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 30 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.