Omicron : देशात कोरोनाचा वाढता संसर्ग कायम आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे रविवारी अनेक प्रमुख शहरे आणि राज्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये घट होत आहे. मुंबईत 7 हजार 895 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, आधीच्या दिवसाच्या तुलनेत जवळपास 26 टक्के कमी आहे, तर पश्चिम बंगालमध्येही रुग्णवाढीत सुमारे 22 टक्क्यांनी घट झाली आहे. देशात रविवारी ओमायक्रॉन संसर्गाच्या विक्रमी 1,702 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉन रुग्णांची संख्या शनिवारच्या तुलनेत 28.17 टक्क्यांनी वाढली आहे. आता ही संख्या 7,743 झाली आहे.


देशात अनेक राज्यांमध्ये दैनंदिवृन रुग्णवाढीमध्ये घट झाली आहे. प्रमुख राज्यांपैकी, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये दररोज कोविड -19 प्रकरणांमध्ये घट नोंदवली गेली. मात्र गुजरात, केरळ आणि कर्नाटकमध्ये नवीन कोरोना संक्रमणांमध्ये वाढ झाली. बेंगळुरू आणि कोलकाता येथेही कोरोना संसर्ग कमी झाल्याची नोंद झाली आहे, तर चेन्नईमध्ये किरकोळ वाढ झाली आहे.


काही शहरे आणि राज्यांमध्ये दैनंदिन रुग्णवाढ मंदावली असताना, देशातील कोरोनारुग्णांचा आकडा मात्र वाढतच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत एकूण 2 लाख 71 हजार 202 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात सध्या 15 लाख 50 हजार 377 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत.


देशातील कोरोनारुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.51 टक्के इतके आहे आणि गेल्या 24 तासात 1 लाख 38 हजार 331 रुग्ण बरे झाले आहेत. तर दुसरीकडे दैनंदिन रुग्णवाढीचा दर शनिवारी 16.66 टक्क्यांवरून रविवारी 16.28 टक्क्यांवर किरकोळ घसरला. गेल्या 24 तासांत आणखी 314 मृत्यू झाल्याने देशातील एकूण कोरोनाबळींचा आकडा 4 लाख 86 हजार 66 वर पोहोचला आहे.


आयआयटी मद्रासच्या प्राथमिक विश्लेषणानुसार, भारताचे 'आर-व्हॅल्यू', जे कोविड-19 किती वेगाने पसरत आहे हे दर्शवते, 7 ते 13 जानेवारी दरम्यान 2.2 नोंदवले गेले, जे मागील दोन आठवड्यांपेक्षा कमी आहे. आयआयटी मद्रासचे गणित विभाग आणि प्रोफेसर नीलेश एस उपाध्ये आणि प्रो एस सुंदर यांच्या अध्यक्षतेखालील सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स अँड डेटा सायन्सच्या विश्लेषणानुसार मुंबईचे आर मूल्य 1.3, दिल्ली 2.5, चेन्नई 2.4 आणि कोलकाता 1.6 होते.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha